१० हजारांची स्विकारली लाच, समाजकल्याणमधील ‘सत्यवान बाबू’ ट्रॅप
By प्रदीप भाकरे | Published: July 4, 2023 05:45 PM2023-07-04T17:45:17+5:302023-07-04T17:47:07+5:30
रंगेहाथ अटक : अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अमरावती : येथील समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपसंचालक कार्यालयातील कनिष्ट लिपिकाला दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जुलै रोजी त्याला त्याच्याच कार्यालयात ट्रॅप केले. सत्यवान रामचंद्र बांबोर्डे (५३) असे लाचखोर कनिष्ट लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार यांची पत्नी समाज कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या श्री गोविंद गुरुकुल आश्रम शाळा रिद्धपूर या संस्थेमधून ३१ जुलै रोजी अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर मिळणारे लाभ, जीपीएफ व पदोन्नती बिल मिळण्यासाठी तक्रारदाराने गतवर्षी अर्ज केला. त्या बिलाबाबत विचारणा केली असता बांबोर्डे याने बिल लवकरात लवकर मिळवून देण्याकरिता १२ हजार रुपये लाचेची मागणी केली. पडताळणीदरम्यान बांबोर्डे याने तडजोडीअंती पहिला टप्पा १० हजार रुपये व बिल मंजूर झाल्यावर दोन हजार रुपये असे लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यामुळे मंगळवारी एसीबीने त्याच्याच कार्यालयात सापळा रचला. आरोपीने ती रक्कम पंचासमक्ष स्विकारली. आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कार्यवाही
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केतन मांजरे यांच्या नेतृत्वातील अंमलदार वैभव जयाले, युवराज राठोड, राहुल वंजारी, विनोद धुळे, नितेश राठोड, चालक पोउपनि सतीश किटुकले आदींनी ही कारवाई केली.