कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळेला केले कैद
By admin | Published: August 29, 2015 12:38 AM2015-08-29T00:38:42+5:302015-08-29T00:38:42+5:30
कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळा पक्ष्याला कैद करून आराधना केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ८.३० वाजता भाजीबाजार परिसरात उघडकीस आला.
भाजीबाजार परिसरातील प्रकार : वनविभाग, पक्षीप्रेमींनी घेतली दखल
अमरावती : कोकिळा व्रतासाठी जिवंत कोकिळा पक्ष्याला कैद करून आराधना केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ८.३० वाजता भाजीबाजार परिसरात उघडकीस आला. याबाबत वनविभाग व पक्षीप्रेमींनी दखल घेऊन अविनाश पाठक यांची चौकशी केली. कोकिळा पक्ष्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून तिच्यावर औषधोपचार सुरु केला आहे.
कोकीळा व्रत हे दर दहा वर्षांनी येत असल्यामुळे महिला विशेष आस्थाने हे व्रत करतात, सुख - समृध्दी, व दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केले जाते, या अनुषंगाने शहरातील बहुतांश स्त्रिया कोकिळा व्रत करीत आहेत. आता कोकिळा व्रत करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे स्त्रियांमध्ये कोकिळा व्रताची ओढ वाढली आहे. या व्रताच्या अनुषंगाने गुरुवारी भाजीबाजार परिसरातील रहिवासी अविनाश पाठक (५५) यांच्या घरी कोकिळेला पिंजऱ्यात कैद स्थितीत वनविभागाला आढळून आली. अविनाश पाठक यांच्या घराजवळील एका वृक्षावर कावळ्याने कोकिळेला जखमी केले. कोकिळा जखमी होऊन पाठक यांच्या घरावर पडली होती. त्यांनी कोकिळेवर घरगुती उपचार करुन पिंजऱ्यात कैद केले. त्यातच कोकिळा व्रत सुरु असल्यामुळे कोकिळेची आराधना सुरु केली. त्यांनी कोकिळेला देवघरात स्थान देऊन पूजा-अर्चना सुरु केली. ही बाब परिसरातील अन्य स्त्रियांना माहिती होताच अनेक स्त्रिया कोकिळेच्या दर्शनासाठी पाठक यांच्या घरी गेल्यात. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पक्षीप्रेमी राघवेंद्र नांदे यांना समजली. याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती देऊन पाठक यांचे घर गाठले. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. लाकडे, बारब्दे, खैरकर, नीलेश करवाळे, वनरक्षक खराते यांच्यासह राघवेंद्र नांदे व नागपुरी गेट पोलिसांनी पाठक यांचे घर गाठून पाहणी केली. त्यावेळी पाठक यांच्या देवघरात ठेवलेल्या पिंजऱ्यात कोकिळा आढळून आली. वनविभागाने पाठक यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी करुन कोकिळेला ताब्यात घेतले. या घटनेमुळे भाजीबाजार परिसरात खळबळ उडाली होती. वनविभागाने कोकिळेला वडाळी वनविभागात ठेवले असून तिच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु केले आहे. (प्रतिनिधी )