अवघ्या १६ दिवसांत दोन भावंडांसह पुतण्याचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:30+5:302021-05-21T04:14:30+5:30
फोटो पी २० मोर्शी फोल्डर मोर्शी : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असताना वरूडपाठोपाठ मोर्शी तालुक्यातदेखील रुग्णसंख्या वाढीस ...
फोटो पी २० मोर्शी फोल्डर
मोर्शी : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असताना वरूडपाठोपाठ मोर्शी तालुक्यातदेखील रुग्णसंख्या वाढीस लागली आहे. अशातच अवघ्या १६ दिवसांत येथील घोरमाडे कुटुंबातील दोन भावंडांसह पुतण्या असे तिघेजण कोरोना बळी ठरले आहेत. या कुटुंबातील तीन कर्ते पुरूष काळाच्या पडद्याआड गेल्याने अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराच्या तुलनेत निमशहरी व ग्रामीण भागात सातत्याने नव-नवीन रुग्ण निघत असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील पुनर्वसन कॉलनी भागात राहणारे सुधीर घोरमाडे (५७) यांच्या आईच्या पोटावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची देखभाल करण्यासाठी सुनील घोरमाडे व दीपक घोरमाडे हे दोन बंधू नागपूर येथे रुग्णालयात होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आईला आरामासाठी मोर्शी येथे आणण्यात आले होते. नेमकी त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुनील घोरमाडे (५४) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने सुनील घोरमाडे यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता, दीपक घोरमाडे व संदेश सुधीर घोरमाडे (३०) यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनाही उपचारासाठी कोविड रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले होते.
घोरमाडे कुटुंबीयांवर उपचार सुरू असताना ५ मे रोजी सुनील घोरमाडे यांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या १० ते ११ दिवसांच्या फरकाने सुनील घोरमाडे यांचा लहान भाऊ दीपक घोरमाडे (५०) यांचा १६ मे रोजी कोरोनाने अमरावती येथे मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांनंतर संदेश सुधीर घोरमाडे याचा १९ मे रोजी कोरोनाने जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याने अवघ्या १६ दिवसांत घोरमाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन सख्खे भाऊ व पुतण्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मोर्शी शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
ट्रक, टिप्परचा व्यवसाय
सुधीर, सुनील व दीपक या घोरमाडे बंधूचा ट्रक, टिप्परचा व्यवसाय आहे. मात्र या सुखवस्तु कुटुंबाला कोरोनाची नजर लागली. सुनील व दीपक या सख्ख्या भावंडांसह संदेशदेखील कर्ता पुरुष होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण घराची जबाबदारी आता घरात सर्वात मोठे असलेल्या सुधीर घोरमाडे यांच्यावर येऊन ठेपली आहे.
चेहराही पाहता आला नाही
दोन भावंड आणि पुतण्याचा अमरावतीच्या कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. कोविड रुग्णांजवळ कुणालाही थांबता येत नाही. त्यामुळे कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना कुणालाही पाहता आले नाही. किंवा त्यांनादेखील कुणी पाहिले नाही. कोरोनाबाधित म्हणून मृत्यू झाल्याने त्यांचे मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले नाहीत. पीपीई किटमध्ये गुंडाळून तिघांवरही अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या आप्तांना चेहरादेखील पाहता आला नाही.