महाविद्यालये सुरु करण्यास अवघे चार दिवस, विद्यापीठांची परवानगी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:41+5:302021-02-11T04:14:41+5:30
अमरावती : राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाविद्यालये सुरू करण्यास अवघे चार दिवस ...
अमरावती : राज्य शासनाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महाविद्यालये सुरू करण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना अद्याप विद्यापीठाने परवानगी दिली नाही. त्यामुळे महाविद्यालये सुरु होणार की नाहीत, याबाबत शैक्षणिक संस्थाचालक संभ्रमात आहेत. विद्यापीठाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडे महाविद्यालये सुरु करण्यासाठी ‘एनओसी’करिता पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालये सुरु करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊनच ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करावीत, असे बंधन लादण्यात आले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय महाविद्यालये सुरु करता येणार नाहीत, अशी शासन गाईडलाईन आहे. त्यामुळे कुलसचिव तुषार देशमुख यांच्या स्वाक्षरीने ३० जानेवारी रोजी महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी मिळण्यासाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांना पत्र पाठविले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॉलेज सुरु करावे की नाही, याबाबत महसूल प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे मिळाली नाहीत. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठाने पत्रव्यवहार केला नाही, अशी माहिती आहे.
०००००००००००००
महाविद्यालयांना परवानगीची प्रतीक्षा
कोरोना संसर्गापासून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आरोग्य संरक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयांचा परिसर, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. आता केवळ चार दिवस शिल्लक असताना महाविद्यालये सुरू करण्यासाठी
परवानगी मिळाली नाही. सॅनिटायझेशन केव्हा करावे, उपाययोजना कशा कराव्यात, या विवंचनेत संस्था चालक आहेत.
००००००००००००००
कोरोना नियमावलींचे पालन बंधनकारक
कोविड १९बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन काटेकारेपणे करावे लागणार आहे. ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही, ही बाब प्रशासनाने स्पष्ट केली. ५ नोव्हेंबर २०२० रोजीच्या युजीसीच्या नियमांचे पालन करणे शिक्षण संस्थाचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
००००००००००
कोट
कुलगुरुंच्या मार्गदर्शनात महाविद्यालये सुरू करण्याच्या अनुषंगाने बुधवारी बैठक होणार आहे. तूर्तास विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाबाबत गाईडलाईन नाही. महसूल प्रशासनाच्या परवानगीनंतरच महाविद्यालये सुरू होतील.
- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
००००००००००००००००००००
कोट
कॉलेज सुरू करण्यासाठी अद्याप विद्यापीठाची परवानगी नाही. शासनादेश जारी झाला असला तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची परवानगी घेऊनच महाविद्यालये सुरु करावी लागणार आहेत. परवानगी मिळाली तरच महाविद्यालय सुरू केेले जाईल.
- पी. व्ही. ठाकरे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती.
०००००००००००००००००००००
जिल्हानिहाय महाविद्यालये
अमरावती: ११८
अकोला: ६१
बुलडाणा: ८४
यवतमाळ: ८३
वाशिम: २६