मजीप्रानेच लावली शहराची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:00 AM2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:35+5:30
मजीप्रा व महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानेच सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सभागृहात सदस्यांनी ज्या सूचना व तक्रारी मांडल्या, त्यावर १५ दिवसांत अहवाल द्या, असे सभापतींनी मजीप्रा अधिकाऱ्यांना सांगितले. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करावी. मजीप्रा व महापालिकेचा एक-एक अधिकारी यासाठी नियुक्त करावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अप्पर वर्धा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असताना शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा कसा, असा सवाल करीत चेतन पवार यांनी सदस्यांच्या तीव्र भावनांना वाचा फोडली अन् सभागृहाचे चित्रच पालटले. सर्वच संतप्त सदस्यांनी महापालिकेच्या आमसभेला उपस्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांसह अधीक्षक अभियंत्यांवर गुरुवारी तब्बल अडीच तास प्रश्नांची सरबत्ती केली. अमृत योजनेच्या कंत्राटदारावर नियंत्रण नाही. यातूनच मजीप्रानेच शहराची वाट लावल्याचा घणाघात सर्वच सदस्यांनी आमसभेत केला.
शहरातील रस्त्यांची दुर्दशा, अमृत योजनेची प्रलंबित कामे, असमान पाणी वितरण, यासह अन्य प्रश्नांंची उत्तरे द्यायला गुरुवारच्या आमसभेत मजीप्राचे अधीक्षक अभियंता चारथळ व कार्यकारी अभियंता कोपुलवार यांना उपस्थित राहण्याची सूचना महापालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार अधिकारी उपस्थित झाले. मजीप्राचे बेपर्वा धोरण व कुणालाही न जुमानणाऱ्या कंत्राटदाराविरोधात सर्वच सदस्यांनी शाब्दिक हल्लाबोल केला.
रस्ते दुरुस्तीच्या कामांचा दर्जा सुमार
पाइप लाइनसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा अत्यंत सुमार आहे. सहा महिन्यांपासून पेव्हर येऊन पडले आहेत. अद्याप लावण्यात आलेले नाही, असा आरोप चेतन पवार यांनी केला. नळावरील मोटर पकडणे कठीण काम आहे, असे मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी सांगताच, पवार कमालीचे संतप्त झाले. १०६ कोटींची थकबाकी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगताच, ती वसुली करण्याची जबाबदारी कुणाची, असा सवाल तुषार भारतीय व चेतन पवार यांनी केला. यावर मोहीम राबवितो, असे चारथळ म्हणाले.
आता मायक्रोलेव्हलवर नियोजन
सभागृहात चर्चेदरम्यान मजीप्राच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावे सदस्यांकडून समोर येत असल्याने आयुक्त संजय निपाणे यांनी ‘वर्किंग स्ट्रक्चर पॅटर्न’ची मागणी चारथळ यांना केली. यामध्ये आता मायक्रो लेव्हलवर नियोजन करू, असे त्यांनी सांगितले. जेथे उंचवटा किंवा मोटरची संंख्या जास्त आहे, तो भाग वगळता अन्य भागात १५ जानेवारीपासून टप्याटप्याने पाणीपुरवठा नियमित सुरु करण्यात येईल व शहरातील कामे नियोजनबद्धरीत्या पूर्ण करण्याचे आश्वासन चारथळ यांनी दिले.
नळातून नुसती हवाच; पाणी केव्हा?
अर्जुननगर प्रभागातील काही भागांत नळ आले की, नुसती हवाच येते. पाणी येईपर्यंत नळ जातात, अशी परिस्थिती गोपाल धर्माळे यांनी विशद केली. या परिसरातील रस्त्यालगत दोन वेळा खोदकाम केल्यामुळे रस्त्यांच्या साइडपट्ट्या गायब झाल्या आहेत. येथे अपघात होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. कंत्राटदार जर अधिकाऱ्यांचे ऐकत नसेल, तर तुम्ही यात पैसे खाल्ले काय, अशी विचारणा विलास इंगोले यांनी केली. यावर कंत्राटदाराला आतापर्यंत २.९३ कोटींचा दंड करण्यात आला व २१ किमी रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचे चारथळ यांनी सांगितले.
तक्रारींवर १५ दिवसांत अहवाल द्या
मजीप्रा व महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानेच सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सभागृहात सदस्यांनी ज्या सूचना व तक्रारी मांडल्या, त्यावर १५ दिवसांत अहवाल द्या, असे सभापतींनी मजीप्रा अधिकाऱ्यांना सांगितले. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करावी. मजीप्रा व महापालिकेचा एक-एक अधिकारी यासाठी नियुक्त करावी. पाइप लाइन दुरुस्ती व रस्ते दुरुस्तीविषयी माहिती महापालिकेला द्यावी. १५ दिवसांत याचा अहवाल द्यावा तसेच नळावर असलेल्या मोटर जप्तीची कारवाई सुरू करावी, असे निर्देश सभापती चेतन गावंडे यांनी दिले.