कँसरशी झुंजणाऱ्या मित्रासाठी कबड्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:09 AM2018-12-23T01:09:09+5:302018-12-23T01:10:28+5:30
कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही कहाणी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव पेठ : कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही कहाणी आहे. नांदगावपेठ येथील तरुणांची.
टोल नाक्यावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया केवळ २१ वर्षे वयाच्या वृषभ दादाराव बानासुरे या कबड्डीपटूला अचानक ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने नांदगाव पेठमधील कबड्डीपटूंनी त्याच्या उपचारासाठी कबड्डीचे सामने खेळून व त्यातील येणाºया बक्षिसामधून आपल्या मित्राला वाचविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. उपचाराच्या खर्चात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून दिवस-रात्र तहान व भूक विसरून नांदगावचे कबड्डीपटू सामने लढत आहेत. आजवर अनेक सामने ज्याने जिंकून दिले, तो आता मृत्यूलाही जिंकणारच, असा विश्वास या कबड्डीपटूंना आहे.
संयमी, शांत स्वभाव असलेला वृषभ लहानपणापासून कबड्डीचा खेळाडू आहे. घरची परिस्थिती बेताची असून, तोच कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. काही दिवसांपूर्वी त्याला ब्लड कँसरचे निदान झाले. सध्या नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँसर हॉस्पिटलला त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपला मित्र या दुर्धर आजाराने ग्रासला असून, आता उपचाराची खरी गरज असल्याने कबड्डीपटूंनी वेगवेगळ्या गावांत जाऊन सामने खेळून मिळालेल्या बक्षिसाची रक्कम उपचारासाठी दिली आहे. चाळीस हजार रुपयांची रक्कम वृषभच्या उपचारासाठी त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर अजूनही अनेक सामने ते वृषभसाठी खेळणार आहेत. सोशल मीडियावर याबाबत आवाहनदेखील करण्यात आले असून, सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
आजवर कबड्डीचे अनेक सामने आम्ही सोबत खेळलो, जिंकलो अन् हरलो. आता मात्र वृषभच्या आयुष्याचा सामना जिंकायचा आहे. या दुर्धर आजारातून त्याला बाहेर काढायचे आहे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्हाला आशा आहे, वृषभ आयुष्याचा हा सामना नक्की जिंकेल.
- चंद्रशेखर सुंदरकर, कबड्डीपटू, वीर केसरी क्रीडा मंडळ, नांदगावपेठ