अमरावती येथे सायन्स कोअर मैदानावरून कडू-राणा आमने-सामने
By गणेश वासनिक | Updated: April 23, 2024 18:12 IST2024-04-23T18:10:37+5:302024-04-23T18:12:42+5:30
Amravati : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दिशाभूल, सुरक्षेच्या कारणांनी पोलिसांनी प्रहार उमेदवारांना ताबा घेण्यापासून रोखले, आ. बच्चू कडूंचा ठिय्या

Bachchu Kadu at Science Core ground
अमरावती: अमरावती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ बुधवार २४ एप्रिल राेजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सायन्स कोअर मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र २३ व २४ एप्रिल रोजी हे मैदान प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या उमेदवारांच्या नावे बुकींग आहे. परंतु, भाजप उमेदवारांनी विनापरवानगी या मैदानावर शहाच्या सभेची तयारी चालविली आहे. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणांनी प्रहार आमदार बच्चू कडू, उमेदवार दिनेश बुब यांना मंगळवारी मैदानाचा ताबा घेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आमदार बच्चू कडू आणि पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मैदानाच्या परवानगीवरुन आमदार बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा हे आमने-सामने येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी पोलिस प्रशासन हे भाजपच्या ईशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केला आहे. बुधवारी २४ एप्रिल राेजी सायन्स कोअर मैदानावर प्रहार उमेदवारांची सभा आणि रॅली घेणार असल्याची दावा त्यांनी केला. आमच्याकडे मैदानाची अधिकृत परवानगी कायदा व सुव्यवस्था तोडण्याचे काम पोलिस करीत आहे. भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे या मैदानाची परवानगी नसताना गृहमंत्री शहा यांची कशी सभा घेण्यास पोलिस प्रशासन सहकार्य करीत आहे, असा टोला लगावला. राणांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिशाभूल असेही आमदार कडू म्हणाले.