ग्रामीण पोलीस दलात 'काका-दीदी' उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:20 PM2019-06-30T23:20:24+5:302019-06-30T23:20:50+5:30
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना या उपक्रमाबाबतचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना या उपक्रमाबाबतचे आदेश दिले आहेत.
पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावा तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या आॅनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती दिली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना पोलीस काका व दीदीचा मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे.
पोलीस काका, दीदी यांनी परस्पर संवादी जागरूकता कार्यक्रमात वाहतूक आणि रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अल्पवयींनावर होणारे लेंगिक गुन्हे, रॅगिंग, ड्रग्ज, इतर विषयावर त्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्या नियमित संपर्कात राहावे, शाळा भेट रजिस्टर ठेवावे व त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये घ्याव्या लागणार आहे. त्याचबरोबर शाळेच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व इतर महत्त्वाच्या कामात सहभागी होऊन त्यांना पोलिसांची कामे व कर्तव्याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सूचित करावे, विविध वयोगटातील विद्यार्थांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करावी लागणार आहे. पोलीस काका व दीदीवर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देखरेख करणार आहेत.
कुठल्याही क्षणी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास पोलीस ताबडतोब मदतीला धावून येतील. त्यामुळे निर्भयपणे परिसरात घडणाºया गुन्ह्याच्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीण पोलीस विभागांतर्गत तालुकास्तरीय तसेच इतर भागातील कॉलेज व शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.या उपक्रमातंर्गत विद्याथीर केंद्रबिंदू असणार आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढविणे, शिक्षकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्यांवर पोलीस लक्ष ठेवणार आहे. शाळांमध्ये रजिस्टरमध्ये असलेल्या नोंदीची दखल घ्यावी लागणार आहे. यात कर्तव्यात कसूर होता कामा नये, याची दखल घेण्यात येणार आहे.
दर महिन्याच्या ५ तारखेला द्यावा लागणार अहवाल
पोलीस काका व दीदी पथकाच्या उपक्रमाबाबत काय उपाययोजना केल्याबाबतचा अहवाल सर्व ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जीविशा घटकात द्यावी लागणार आहे, हे विशेष.
अनुचित घटनेबद्दल तत्काळ माहिती
शालेय परिसरात किंवा इतरत्र अनुचित प्रकार घडत असेल किंवा विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल तर निर्भयपणे या घटनेबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे कळविले आहे.
पोलीस काका-दीदी उपक्रम सोबत इतर पाच उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू असणार आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जातील.
- दिलीप झळके
जिल्हा पोलीस अधीक्षक