कांद्रीबाबा : चुली पेटल्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:35 AM2019-06-09T01:35:11+5:302019-06-09T01:37:14+5:30
तारू बांदा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांद्री बाबा मंदिर परिसरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटविण्यास वनविभागाने लादलेली बंदी झुगारून आदिवासींनी तेथे चुली पेटविल्या. शनिवारी मंदिर परिसरातच महाप्रसाद बनविण्यात आला. वनविभागाने आदिवासी बांधवांच्या या चुली पेटविण्याच्या घटनेचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : तारू बांदा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांद्री बाबा मंदिर परिसरात स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटविण्यास वनविभागाने लादलेली बंदी झुगारून आदिवासींनी तेथे चुली पेटविल्या. शनिवारी मंदिर परिसरातच महाप्रसाद बनविण्यात आला. वनविभागाने आदिवासी बांधवांच्या या चुली पेटविण्याच्या घटनेचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात आले.
आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कांद्रीबाबा मंदिराचा परिसर तारूबांदा वनपरिक्षेत्राच्या ७६६ क्रमांकाच्या वनखंडात येते. भाविकांनी तेथे दर्शन करावे पण महाप्रसादाकरिता चूल पेटवू नये. त्यामुळे वनविभागाच्या अखत्यारितील जंगलाला आग लागू शकते. त्याने जंगलातील औषधीयुक्त वनस्पती नष्ट होण्यासह वन्यप्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असे वनविभागाकडून सुचविण्यात आले. त्यानंतर आदिवासी व वनविभागात संघर्ष निर्माण झाला होता. आदिवासींनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, शनिवारी तारूबांदा येथील आदिवासी बांधवांनी चूल पेटवून दर्शनाकरिता येणाºया भाविक भक्तांकरिता महाप्रसाद तयार केला. त्यासह इतर भागातून येणाºया आदिवासी बांधवांनी सात ते आठ ठिकाणी चूल पेटवून महाप्रसाद तयार केला होता. त्यामुळे वनविभागाच्या बंदीनंतरही आदिवासी बांधवांनी श्रद्धेपोटी तेथे ठरविल्याप्रमाणे मंदिर परिसरात चूल पेटवा आंदोलन केले.
गावकऱ्यांसोबत परिसरातील पाटकहु, भिरोजा, चौराकुंड, आढाव, राक्षा या परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते. आदिवासी बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्याकरिता मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग गैलवार, प्रकाश घाडगे, कालू मालविय, विनोद वानखडे व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, सरपंच मंदिराचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित होते. आदिवासी बांधवांच्या चूल पेटवा आंदोलनाला सध्यातरी वनविभागाकडून कोणतेही प्रतिउत्तर देण्यात आले नाही. परंतु वनविभागाच्या नाक्यावर व मंदिर परिसरात झालेल्या सभेच्या ठिकाणी वनविभागाने व्हिडिओ शूटिंग केल्याची माहिती आहे.
मंदिर परिसराला छावणीचे स्वरुप आदिवासी व वनविभागात संघर्ष निर्माण होऊ नये, त्याकरिता शुक्रवारी उशिरा वनविभागाने पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांना लेखी पत्र दिले. त्यानुसार, अमरावती येथून दंगा नियंत्रण पथक व अतिरिक्त पोलीस कुमक, गुप्तचर विभागाचे पोलीस अधिकाºयांना पाचारण करण्यात आले. मंदिर परिसरात साध्या वेशभूषेत गुप्तचर विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. इतर कर्मचारी हरिसाल येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या शाळेत आंदोलन होइपर्यंत हजर होते. तारुबांदा येथील वनविभागाच्या विश्रामगृहात पोलीस उपअधीक्षक सोयाम मुंडे, ठाणेदार विलास कुलकर्णी, पीएसआय रविकिरण खन्दारे हे आंदोलकांवर नजर ठेवून होते.