अमरावतीत आढळला कंठेरी चिखल्या पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:47 PM2018-03-31T22:47:28+5:302018-03-31T22:48:07+5:30
भारतीय सागर किनाऱ्यांवर स्थलांतर करणाऱ्या कंठेरी चिखल्या पक्ष्याची प्रथमच मध्य भारतात, अमरावती जिल्ह्यातील तलावावर नोंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारतीय सागर किनाऱ्यांवर स्थलांतर करणाऱ्या कंठेरी चिखल्या पक्ष्याची प्रथमच मध्य भारतात, अमरावती जिल्ह्यातील तलावावर नोंद करण्यात आली. कार्स संस्थेच्या पक्षिनिरीक्षकांनी विदर्भात पहिल्यादांच या पक्ष्याची नोंद केली. यामुळे पक्षिप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
सेंटर फॉर अॅनिमल रेस्क्यू अँड स्टडी या संस्थेच्या पक्षिअभ्यासकांनी शहरालगतच्या तलावावर केलेल्या निरीक्षणादरम्यान कंठेरी चिखल्या या मध्य भारतासाठी नवीन पक्ष्याची नोंद घेतली आहे. जिल्हा वनवैविध्याने नटल्याने देशविदेशातील अनेक पक्षी स्थलांतरण करून येतात. कार्सचे शुभम गिरी व प्रशांत निकम यांना जिल्ह्यातील एका तलावावर एक लहानसा पक्षी आढळला. छायाचित्रात कैद झाल्यानंतर तो चंचल पक्षी कंठेरी चिखल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आर्क्टिक महासागरातून स्थलांतर
कंठेरी चिखल्या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी लहान कंठेरी चिखल्या पक्ष्यासारखाच आहे. पण, प्रजननकाळात कंठेरी चिखल्याची चोच आणि पाय यांचा रंग बदलून काहीसा गुलाबी होतो, असे सूक्ष्म निरीक्षण शुभम गिरी यांचे आहे. हिवाळ्यात भारतीय सागरी किनाºयांवर स्थलांतरित होणारा हा आर्क्टिक महासागर प्रदेशातील पक्षी प्रथमच विदर्भात आणि तोही प्रजननकाळात आढळल्याने पक्षिअभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आखुड कानाच्या घुबडांची नोंद
कार्सच्या शुभम गिरी आणि प्रतीक खंडारे यांनी सर्पिका व आखूड कानाच्या घुबड या पक्ष्याची काही दिवसांपूर्वी नोंद घेतली. स्थलांतरित पक्ष्यांच्या सवयी, खाद्य, अधिवास, प्रजनन या सर्व बाबींवर शुभम गिरी, प्रतीक खंडारे, प्रशांत निकम, विजय खोत्ते हे युवक अभ्यास करीत आहेत. पक्षिनिरीक्षकांच्या या कार्याबद्दल वरिष्ठ वन्यजीव अभ्यासक राघवेंद्र नांदे, सत्यजित देशमुख, राहुल बोबडे, चेतन भारती, राहुल दोड, सचिन सवाई यांनी अभिनंदन केले.