मराठी वाङ्मयाची काशी रिद्धपूर!

By admin | Published: February 27, 2016 12:13 AM2016-02-27T00:13:14+5:302016-02-27T00:13:14+5:30

श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे.

Kashi Riddhpur of Marathi literature! | मराठी वाङ्मयाची काशी रिद्धपूर!

मराठी वाङ्मयाची काशी रिद्धपूर!

Next

मराठी राजभाषा दिन : लीळाचरित्रासह अनेक मराठी ग्रंथांचे लेखन
सुमित हरकूट  चांदूरबाजार
श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला आहे. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.
मराठी सरिता जेथे उगम झाली ती हीच पावनभूमी आहे. मराठी वाङमयाची पंढरी आहे. यामुळे प्रत्येक लेखकाने, साहित्यिकानेच नाही तर प्रत्येक मराठी माणसाने या मातीचा बुक्का मस्तकावर लावावा व या पवित्र ऐतिहासिक मातीवर आपला माथा टेकवावा, अशी ही भूमी आहे.
ही माती गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तवाने पुनित झालेली आहे. महीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला. समतेचा विचार १३ व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते. ते चक्रधरांचे गुरु होते. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमितच.
नागदेवाचार्यांनी लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठी भाषेतच नव्हे, तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत लिहून घेतले व बोली भाषेला शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले. संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले. वऱ्हाडी बोली आद्यग्रंथाची भाषा झाली. चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमित झाला. मराठी भाषेला त्यांनी याच भूमितून शास्त्रभाषेचा दर्जा प्राप्त करुन दिला. ही फार मोठी वाङमयीन भाषिक क्रांती होती.
महानुभावांच्या १४ सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्राची क्रांती होय. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक होते. चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत. कथा, काव्य, चरित्र, आत्मचरित्र, शास्त्रीय ग्रंथ, व्याकरण, भाषा विज्ञान, लिपीशास्त्र आदी सर्व प्रकारची वाङ्मय निर्मिती यात झाली. तत्त्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला.
मराठी भाषेचा झेंडा पंजाब, अफगाणिस्थानापर्यंत येथूनच पोहोचला. मराठी भाषाप्रेमींनी या भूमिला मानाचा मुजरा करावा, अशी ही भूमी पवित्र आहे.
२७ फेब्रुवारीला साजरा होत असलेल्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून रिद्धपूर नगरीचे हे महात्म्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी येथील संत मंडळीही सरसावली आहे. रिद्धपूरच्या मातीत मराठी वाङमयाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

Web Title: Kashi Riddhpur of Marathi literature!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.