काटकुंभ जि.प. शाळेलाही टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:20 AM2017-07-19T00:20:18+5:302017-07-19T00:20:18+5:30
तालुक्यातील काटकुंभ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने ...
मेळघाटातील शिक्षणाची लक्तरे : काजलडोहच्या ‘त्या’शिक्षकांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
चुरणी/चिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता टाळे ठोेकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. शाळेची वेळ उलटून गेल्यावरही शाळेत अनुपुस्थित असलेल्या काजलडोह जि.प.शाळेतील पाचही शिक्षकांवर चौकशी अहवाल येताच कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
मेळघाटात शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे विविध घटनांमधून वारंवार सिद्ध होत असते. मात्र, आता उपरोक्त दोन्ही घटनांवरून आदिवासी गावकरी जागृत झाल्याचे दिसते. मंगळवारी सकाळी ११ वाजता काटकुंभ येथील जि.प.हायस्कूलमध्ये इयत्ता नववी आणि दहाव्या इयत्तेसाठी इंग्रजी आणि मराठी विषयासाठी भाषा शिक्षक देण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी वारंवार लेखी अर्जाद्वारे केली. मात्र, सतत त्याकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोेद राठोड, राजेश मालवीय, महेश मालवीय, दिलीप राठोड, पीयूष मालवीय, गुलाब जामुनकर, हरिकिशोर राठोड, राजू राठोड, मधुकर मालवीय यांच्यासह शेकडो संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आणि विद्यार्थ्यांना सुटी दिली. भाषा शिक्षकांची नियुक्ती होेईपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचे निवेदन गावकऱ्यांनी पालकमंत्री प्रवीण पोटेंसह आ. प्रभुदास भिलावेकर यांना दिले आहे.
दोन दिवसांत दोन शाळांना टाळे
काजलडोह येथील जि.प.शाळेतील पाचही शिक्षक सोमवारी दुपारी शाळेची ११ वाजताची वेळ टळून गेल्यानंतर म्हणजे १२.३० वाजता शाळेत पोहोचले. तत्पूर्वी संतप्त गावकऱ्यांसह पंचायत समिती सदस्य, सरपंचांनी शाळेला टाळे लावले होते. मंगळवारी काटकुंभ येथील हायस्कूलला शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी कुलूप ठोकण्यात आले. परिणामी परतवाडा, अमरावतीहून येथे ये-जा करणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
चौकशीचे आदेश, कारवाई होणार
काजलडोह येथील शाळेत चक्क दुपारी १२.३० वाजता पोहोचणाऱ्या पाचही शिक्षकांच्या चौकशीचे आदेश मंगळवारी चिखलदरा पंचायत समितीद्वारे केंद्रप्रमुखांना देण्यात आले तसेच चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
काटकुंभ जि.प.हायस्कूलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विषय शिक्षक देण्यात आले होते. मात्र, गावकऱ्यांना ते मान्य नसल्याने मंगळवारी शाळेला टाळे लावण्यात आले. उशिरा शाळेत पोहोचणाऱ्या काजलडोह येथील पाचही शिक्षकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- गंगाधर मोहने, प्र-गटशिक्षणाधिकारी, पं.स., चिखलदरा