गणोरीत काठेवाडींचा हैदोस, कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Published: February 17, 2017 12:19 AM2017-02-17T00:19:06+5:302017-02-17T00:19:06+5:30

भातकुली तालुक्यातील गणोरी आणि परलाम यागावांमध्ये काठेवाडी जनावरांचे पाच कळप शिरविण्यात

Kathawadi's hedos in Ganodar, district collector's order | गणोरीत काठेवाडींचा हैदोस, कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गणोरीत काठेवाडींचा हैदोस, कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next

गावकऱ्यांच्या तक्रारी : तहसीलदार, ठाणेदार पोहोचले गावात
अमरावती : भातकुली तालुक्यातील गणोरी आणि परलाम यागावांमध्ये काठेवाडी जनावरांचे पाच कळप शिरविण्यात आल्यामुळे गुरुवारी गावकरी आणि काठेवाडींमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिलेत.
भातकुली उपविभागात गायी, बैल आणि मेंढ्या याकाठेवाडी जनावारांचा असह्य त्रास शेतकऱ्यांना आहे. काठेवाडींचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे हरिभाऊ मोहोड यांनी यापूर्वी आंदोलनही केले होते.
काठेवाडी जनावरांना भातकुली उपविभात शिरण्याची बंदी आहे. मनाईहुकूम असतानाही काठेवाडींनी गणोरी आणि परलाम या गावांमध्ये साधारणत: आठवडाभरापासून झुंडीने जनावरे शिरविली आहेत. कळपाने आलेली ही जनावरे चक्क शेतात शिरविली जातात. वर्षभर रक्ताचे पाणी करून शेतकऱ्यांनी कापणीपर्यंत जोपासलेली पिके काठेवाडी गुरांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत फस्त केलीत.
काठेवाडींच्या वाढत्या गुंडगिरीविरुद्ध गुरुवारी गणोरीतील काही गावकरी एकत्र झाले. काठेवाडींना त्यांनी गावाबाहेर जाण्याचा इशारा दिला. ३४ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरींची तक्रार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना अमरावती येथे देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीचे गांभीर्य जाणून भातकुलीच्या तहसीलदार वैशाली पाथरे यांना कारवाईचे आदेश दिलेत.
भातकुलीचे नायब तहसीलदार अशोक काळीलकर आणि भातकुली पोलीसांचे पथक रात्री गणोरी गावात दाखल झाले. दरम्यान गणोरीलगतच्या परलाम गावातील शेतकऱ्यांनीही एकत्रितपणे पोलीस ठाणे गाठले. हे गाव लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे लोणी पोलिसही रात्री परलाममध्ये दाखल झाले.
गणोरीच्या शेतकऱ्यांनी भातकुली पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदविली. सामूहिक तक्रारीवर ३४ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. इरशाद मुस्तफा खान यांच्या शेतातील अर्धा एकरातील पीक खल्ल्यामुळे त्यांनीही भातुकली पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे 'लोकमत'ला सांगितले.

Web Title: Kathawadi's hedos in Ganodar, district collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.