वनकर्मचारी-काठेवाडीत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 10:39 PM2018-07-06T22:39:01+5:302018-07-06T22:40:26+5:30

वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत कोंडेश्वर परिसरातील राखीव वनात चरत असलेली काठेवाडी गुरे ताब्यात घेताना वनकर्मचारी आणि काठेवाडी यांच्यात संघर्ष झाला. काठेवाडींनी गुरे पळवून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली.

Kathwadi conflict | वनकर्मचारी-काठेवाडीत संघर्ष

वनकर्मचारी-काठेवाडीत संघर्ष

Next
ठळक मुद्देबडनेरा पोलिसांत तक्रार : उपवनसंरक्षकांची पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत कोंडेश्वर परिसरातील राखीव वनात चरत असलेली काठेवाडी गुरे ताब्यात घेताना वनकर्मचारी आणि काठेवाडी यांच्यात संघर्ष झाला. काठेवाडींनी गुरे पळवून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. यावेळी पोलिसांनादेखील पाचारण करण्यात आले होते, हे विशेष.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच बडनेरा, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, वडाळी, माळेगाव, अंजनगाव बारी, भानखेडा भागात काठेवाडी गुरांसह मेंढपाळ खासगी जागेवर राहुट्या करून राखीव वनात अवैध चराई करतात. त्यामुळे वनविभागाने काठेवाडी गुरे, मेंढपाळांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास उपवनसंरक्षक हेमंत मिणा हे जंगल गस्तीवर असताना त्यांना राखीव वनांत काठेवाडी गुरे आढळली. त्यांनी ही गुरे ताब्यात घेण्यास सुरूवात केली. मात्र, काठेवाडींनी २० ते २५ गुरे पळवून नेली. काठेवाडींनी यावेळी वनाधिकारी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर डीएफओ मिणा यांच्या मार्गदर्शनात वडाळीचे आरएफओ कैलास भुंबर, वनपाल विनोद कोहळे, राजेश घारगेसह २५ ते ३० वनकर्मचाऱ्यांनी या भागात कोम्बिंग आॅपरेशन राबविले. बडनेराचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी घटनास्थळी आले. याबाबत बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
डीएफओंचा पोलीस आयुक्तांना फोन
कोंडेश्वर परिसरात काठेवाडींकडून वनकर्मचाऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या, शिवीगाळ केली जात असताना, घटनास्थळी पोहोचलेले उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना भ्रमणध्वनीहून माहिती दिली. त्यानंतर बडनेरा पोलीस निरीक्षक कुळकर्णी यांनी घटनास्थळ गाठून काठेवाडींचा अतिरेक रोखला.
ड्रोन कॅमेऱ्यांनी गुरांचा शोध
राखीव वनात काठेवाडी गुरे, मेंढ्यांची अवैध चराई होत असताना आता गुरांचा शोध ड्रोन कॅमेºयातून घेतला जाणार आहे. वनविभागाने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला असला तरी शुक्रवारी पळवून नेण्यात आलेली काठेवाडी गुरे कॅमेऱ्यात कैद झाली नाहीत. मात्र, या कारवाईमुळे काठेवाडींमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
पायदळ गस्तीच्या सूचना
राखीव वनात काठेवाडी गुरे, धनगरांच्या मेंढ्यांची अवैध चराई रोखण्यासाठी वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी वनरक्षकांना पायी गस्तीच्या सूचना दिल्या आहेत. दरदिवशीचा अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र त्यांनी काढले आहेत.

वृक्षलागवडीच्या पाहणीसाठी आलेले उपवनसंरक्षक मिणा यांनी कोंडेश्वरच्या डोंगरावर चराई करणारी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. काठेवाडी पळून जाताच त्यांची गुरेही सुसाट पळाली. वाद झाला नाही.
- शरद कुळकर्णी, पोलीस निरीक्षक, बडनेरा.

कोंडेश्वर परिसरातील राखीव वनजमिनीवर काठेवाडींची गुरे चराई करीत होते. ही गुरे काठेवाडींनी कोठे पळविली, याचा ‘ड्रोन’ने शोध घेत आहोत. बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Kathwadi conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.