काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस थांब्याचा प्रस्ताव फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:46 PM2018-05-14T23:46:35+5:302018-05-14T23:46:35+5:30
येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.
पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झाली. मात्र, या गाडीला चांदूर रेल्वे येथे थांबा नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर पसरला आहे. चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता पुण्याकडे जाणाºया एकाही गाडीचा थांबा नाही. येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.
रेल रोको कृती समितीने पुण्याला जाण्यासाठी एका रेल्वे गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. खासदार रामदास तडस यांनीदेखील रेल्वे बोर्डाला पत्र देऊन पुणे-काझीपेठ या गाडीला चांदूर रेल्वे व हिंगणघाट स्थानकांवर थांबा देण्याची मागणी २० आॅक्टोबर २०१७ रोजी केली होती. यावरून रेल्वे बोर्डाने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन्ही स्थानकांवर या गाडीचा थांबा परिचालन दृष्टीने व्यावहारिक असल्याच्या पत्रासह प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठविला. परंतु, मुख्यालयाने ७ मार्च २०१८ रोजी हिंगणघाट स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव मान्य केला, तर चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव धुडकाून लावला आहे. सदर माहिती नितीन गवळी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविल्याची माहिती आहे.
या गाडीचा थांबा मिळवूनच देणार, अशी आशा खा.रामदास तडस हे सात महिन्यांपासून चांदूर रेल्वेवासीयांना दाखवित होते. परंतु, ही आशा आता मावळली आहे.
गरीबरथचा थांबा मिळवून देतो -तडस
एकेवेळी काझीपेठ-पुणे या गाडीला चांदूर रेल्वेत थांबा मिळणारच, असे सांगणारे खासदार रामदास तडस यांच्याशी एका समारंभात स्थानिक पत्रकारांनी याविषयी चर्चा केली व प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आणून दिले. तडस यांनी चांदूर रेल्वे स्थानकावर आता गरीबरथ एक्सप्रेसचाच थांबा मिळवून देणार असल्याचे वक्तव्य यावेळी केले. या वक्तव्यावरून खा. तडस काझीपेठ-पुणे गाडीच्या थांब्याबाबत किती प्रयत्नशील होते, हे दिसून आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.