कर्मचारी शिक्षकासाठी राखीव खाटा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:12 AM2021-05-01T04:12:34+5:302021-05-01T04:12:34+5:30
अमरावती : आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोविड -१९ संबंधित कार्यात कोरोना योद्धा म्हणून अनेक कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ...
अमरावती : आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोविड -१९ संबंधित कार्यात कोरोना योद्धा म्हणून अनेक कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या सेवा संलग्न करण्यात आलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. याकरिता कोविड रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाव्दारे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून सध्या व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सहजतेने उपलब्ध होत नाही. कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत प्रत्यक्ष कार्य करीत असताना संबंधित कर्मचारी, शिक्षक अथवा त्यांचे कुटुंबीय कोरोना संक्रमित झाल्यास त्यांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. करिता या मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अशा वर्कर अथवा त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोना संक्रमित झाल्यास त्यांचेकरिता सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात व इतर सर्व आरोग्य सुविधा केंद्रात किमान १५ टक्के खाटा राखीव ठेवण्यात याव्यात. अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, सरचिटणीस संभाजी रेवाळे, राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर कार्याध्यक्ष मनीष काळे आदींनी केली आहे.