खरिपात पेरणीसाठी घरचे बियाणे राखून ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:02+5:302021-05-03T04:08:02+5:30
चांदूर बाजार : मागील खरिपात सोयाबीन काढणीच्या वेळी सतत पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम ...
चांदूर बाजार : मागील खरिपात सोयाबीन काढणीच्या वेळी सतत पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या खरीप हंगामात, सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासणार आहे. बियाणे कमी असल्यामुळे त्याची दरवाढही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ज्या शेतकऱ्यांकडे घरचे सोयाबीन आहे, त्यांनी पेरणीसाठी घरचे सोयाबीन राखून ठेवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे.
येत्या खरिपात तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी तालुक्यात अंदाजे साडेदहा हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची गरज भासणार आहे. परंतु यावर्षी बियाणे कंपण्यांकडून प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा अत्यल्प होण्याची शक्यता आहे. तेव्हा अप्रमाणित बियाणे खरेदी करताना, शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी फसगत होण्यापेक्षा घरचे सोयाबीन वापरणे सोयीचे ठरेल. त्यातून फसगत टळून शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील खर्चही कमी होईल. मात्र, घरचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी त्याची उगवणशक्ती तपासून घेणे गरजेचे आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांकडे आजघडीला ३ हजार क्विंटल सोयाबीन असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडील या सोयाबीनमुळे तालुक्याची सोयाबीन बियाण्यांची अंदाजे ३० टक्के पूर्तता होऊ शकते. परंतु सध्या बाजारात सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे घरी सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचा, सोयाबीन विक्रीकडे कल दिसून येतो. त्यामुळेच तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी घरचे बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोट
यंदा बियाणे खरेदी करताना कृषी केंद्रातच बियाण्यांची उगवणशक्ती तपासून पाहा. त्यानंतरच बियाणे खरेदी करा. थैलीतील बियाणे काढून त्याची उगवणशक्ती शेतकऱ्यांना दुकानातच तपासून देण्याची व्यवस्था कृषी केंद्रांत असेल. त्यासाठी जागेवरच उगवण शक्ती तपासणी किट, कृषी केंद्रात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सोनल दामोदर,
प्रभारी तालुका कृषी अधिकारी चांदूरबाजार