दारुबंदीच ठेवा कायम
By admin | Published: April 4, 2017 12:19 AM2017-04-04T00:19:43+5:302017-04-04T00:19:43+5:30
पंचवटी ते वलगाव राज्यमहामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
पालकमंत्र्यांना निवेदन : व्हीएमव्ही रस्त्यावर मद्यपींचा हैदोस
अमरावती : पंचवटी ते वलगाव राज्यमहामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या मार्गावर दारूबंदीचा निर्णय योग्य असून पालकमंत्र्यांनी या मार्गाचे हस्तांतरण थांबवावे, अशी मागणी मैत्री विद्यार्थी हेल्पलाईन संघाने पालकमंत्री प्रवीण पोटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू दुकाने व बारवर बंदी आणली आहे. हा निर्णय सर्वार्थाने योग्य आहे. परंतु आता शहरातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील पंचवटी ते वलगाव राज्य महामार्गाला महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, असे होऊ नये, अशी मागणी मैत्री हेल्पलाईन संघाने पालकमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनानुसार, पंचवटी-वलगावकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. शाळा-महाविद्यालयांचा परिसर असल्याने याच मार्गाच्या सभोवताल अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. अशा स्थितीत महामार्गावरील बार, दारू दुकानांमध्ये येणारे मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात. नागरी वस्तींमधील सर्व्हिस लाईनचा आधार यासाठी मद्यपी घेतात. या दारूड्यांमुळे विद्यार्थिनींची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे.
रस्ते हस्तांतरणाला विरोध
अमरावती : तंत्रनिकेतन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, विमलाबाई देशमुख महाविद्यालया, डॉ.पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन, विदर्भ महाविद्यालय, फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी या मार्गावरील मद्यपींच्या हैदोसाला कंटाळले आहेत. मद्यपी भरधाव वाहने पिटाळत असल्याने या मार्गावरील अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून पालकमंत्र्यांनी हा मार्ग महापालिकेला हस्तांतरित करून पुन्हा दारूविक्रीचा मार्ग प्रशस्त होऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर देवीदास मानकर,उत्तम याऊल, भास्कर ठाकरे, प्रताप मोहोड, अविनाश भाकरे, साहेबराव तायडे, आर.एम.चव्हाण, उल्हास येते, रवींद्र लहाने, पवन हिरडे आदींच्या सह्या आहेत.