पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:47+5:302021-06-05T04:10:47+5:30
विजय सिंघल यांचे निर्देश अमरावती : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ...
विजय सिंघल यांचे निर्देश
अमरावती : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यासाठी वीज यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात यावे, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी लॉकडाऊनचे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सर्व नागरिक घरी असून, आवश्यक सेवेतील कर्मचारी फक्त सेवेत आहेत. पावसाळ्यात विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठ्याची पूर्वतयारी म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यामध्ये वीज यंत्रणेलगतच्या झाडाच्या फांद्या तोडणे, फुटलेले पिन आणि डिस्क इन्सुलेटर बदलणे, तपासणी व दुरुस्त करणे, रोहित्रांच्या ऑईल पातळीची तपासणी, ऑइल गळती थांबवणे, वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहिन्यांचे तात्पुरती जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदलणे, जीर्ण झालेल्या वायर बदलणे, जळालेल्या व तुटलेल्या वायर बदलणे, उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दूर करून विद्युत यंत्रणा व्यवस्थित ठेवणे अशी अनेक कामे गतीने केली गेली आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करावा व सोबतच यंत्रणा दुरुस्तीचे काम देखील युद्धपातळीवर करावे असे निर्देशही सिंगल यांनी दिले.
वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधीत वीजग्राहकांना देण्यात यावी. पावसाळ्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी दुरुस्ती काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करावा व नागरिकांनाही विद्युत अपघात टाळण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने मोठे व कोविड रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.