यंदाचाच कांदा ठेवा जपून; बियाणे दोन हजारांवरून पाचशेवर, क्षेत्रही घटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 11:11 PM2022-11-13T23:11:45+5:302022-11-13T23:12:17+5:30
लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे लागवडक्षेत्रात कमी येत आहे. यामुळे कांद्याच्या बियाण्याची मागणी कमी झाल्याने गतवर्षी किलोमागे दोन हजार रुपयांवर असलेले बियाणांचे भाव यंदा पाचशेवर आले आहेत. त्यामुळे यंदाचाच कांदा ठेवा जपून म्हणण्याची वेळ आलेली आहे.
जिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे क्षेत्र राहते. त्याच्या तुलनेत यंदा फक्त ५०० हेक्टरमध्येच कांद्यांची लागवड होण्याची शक्यता आहे. साहजिकच बियाणांची मागणी यावर्षी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कांदा बियाण्याच्या दरात कमालीची घसरण
दरवर्षी कांदा बियाणे दरात वाढ होत असते. यंदा उलट स्थिती आहे. लागवडक्षेत्र घटल्याने बियाणांची मागणी कमी झाली व गतवर्षी दोन हजार रुपयांवर असलेले बियाण्यांचा भाव आता ३०० ते ५०० रुपयांवर आलेला आहे.
गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांनाही फटका
कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. साठवणुकीचा कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
व्यापाऱ्यांना मात्र फायदा
सुरुवातीच्या काळात मातीमोल भावाने कांदा खरेदी केला व दर वाढल्यानंतर विक्री केल्याने व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते. त्याच्या तुलनेत उत्पादकांना फटका बसला आहे.
नुकसानभरपाई मिळेल काय?
प्रतिकूल वातावरण, पाऊस यामुळे कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान झाले आहे. दर घसरल्याने बियाणे शेतकऱ्यांकडे पडून आहे. या प्रकारात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
कांदा लागवडीचे क्षेत्रही घटले
जिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टरमध्ये कांद्याची लागवड दरवर्षी होते. त्याच्या तुलनेत यंदा ५०० ते ८०० हेक्टरमध्येच लागवड होण्याची शक्यता आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यासह अन्य कारणांमुळे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्यांनी बाजाराकडेही लक्ष द्यावे.
शेतकरी काय म्हणतात....
मागील वर्षी कांदा बियाणांना मोठी मागणी व यामुळे कमतरता होती. दोन हजारांवर दर पोहोचले होते. त्यातुलनेत यंदा बियाणे उपलब्ध आहेत, तर मागणी कमी आहे. हे गणित एखाद्या वर्षी तरी सारखे असावे.
- संजय जाजू, कृषी निविष्ठा विक्रेता
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी पिकांची वाट लागत आहे. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. भाव वाढतील, या अपेक्षेने साठवणूक करायची तरी कोणत्या मालाची? हा मोठा प्रश्न आहे.
- संजय मालपे, शेतकरी