काळा बाजाराला चाप; 'पॉस'च्या वापरानं केरोसिनची मागणी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:03 PM2018-10-11T18:03:39+5:302018-10-11T18:05:39+5:30
सप्टेंबरमध्ये केरोसिनच्या मागणीत सात लाख लिटरनं घट
अमरावती : शासनाने आता परवानाधारक केरोसीन विक्रेत्यांकडून ‘पीओएस’ मशीनद्वारेच अनुदानित केरोसिन वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे काळा बाजाराला चाप बसला आहे. पश्चिम विदर्भात ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात केरोसीनची मागणी तब्बल ७ लाख ६८ हजार लिटरने घटली आहे. गॅस जोडणीधारकांची खरी आकडेवारी मिळणे दुरापास्त असल्यामुळे पुरवठा विभागाने ‘पॉस’ मशीनद्वारेच केरोसीन वितरणाची पद्धती अवलंबली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अनुदानित दराचे केरोसिन ५९ हजार ५३५ किरकोळ परवानधारक विक्रेत्यांद्वारा राज्यातील ८८ लाख रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येते. यामध्ये ३६ हजार दुकानांमधून फक्त केरोसीन, तर २३ हजार रेशन दुकानांमधून धान्यासोबत केरोसिन वितरित करण्यात येते. दरम्यान, शासनाने गॅस जोडणी नसलेल्यांनाच अनुदानित केरोसिन वाटपाचा निर्णय घेतला. मात्र, गॅस जोडणीधारकांची अचूक माहिती प्राप्त होत नसल्याने रेशन कार्डावरील स्टॅम्पिंग करण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे शासनाने आता पीओएस मशीनद्वारेच केरोसिन वितरणचा निर्णय घेतला. त्यामुळे ७.६८ लाख लिटर केरोसिनची बचत झाली आहे. रास्त भाव दुकानातील पीओएस मशीनवर कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला केरोसिनचे वितरण करण्यात येत आहे. आधार जोडणी झाली नसल्यास, त्याला ‘ईकेवायसी’ करून केरोसिनचे वितरण करण्यात येत आहे. शिधापत्रिकेची माहिती ई-पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शासनप्रमाणित पर्यायी ओळखपत्राचा वापर करून केरोसिन वितरण करण्यात येत आहे.
विभागात आता पीओएस मशीनच्या वापराने केरोसिन वाटप करण्यात येत आहे. यामुळे काळाबाजाराला चाप बसला. एका महिन्यात ७.६८ लाख लिटर केरोसिनची बचत झाली आहे.
- रमेश मावस्कर, विभागीय उपायुक्त (पुरवठा)
केरोसिनच्या मागणीतली तुलनात्मक स्थिती (किलोलिटर)
जिल्हा ऑगस्टचा कोटा सप्टेंबरमधील मागणी बचत
अमरावती ८४० ७२० १२०
अकोला ५८८ १३२ ४५६
वाशिम ३०० ३२३ -२६
यवतमाळ ५५२ ४५६ ९६
बुलडाणा ८२८ ७०८ १२०
एकूण ३१०८ २३४० ७६८