बेनोडा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:41+5:302021-04-27T04:12:41+5:30
बेनोडा शहीद : स्थानिक बेनोडा ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने विरोधकांना विश्वासात न घेता सुरू केलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध विरोधी गटातील ...
बेनोडा शहीद : स्थानिक बेनोडा ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाने विरोधकांना विश्वासात न घेता सुरू केलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध विरोधी गटातील सदस्यांनी आवाज उचलल्याने मासिक सभेत खडाजंगी झाली.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी ठरलेल्या सत्ताधारी गटाने सर्वसमावेशकता बाजूला ठेवून मनमानी राज्यकारभार करायला सुरुवात केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. सत्ताधारी विरोधकांना विश्वासात न घेता परस्पर ठराव करून कामाच्या पाठपुराव्यासाठी अमरावतीला जातात. पाठपुरावा बाजूला ठेवून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. जिल्हा परिषदेत जाण्यासाठी ए.सी. गाडी व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी गावविकासाठी आलेला पैसा उधळला गेल्याचा आरोप सदस्य प्रिया राऊत यांनी केला आहे.
मासिक सभेत प्रस्तावावर चर्चा सुरू असताना प्रश्न विचारला असता, सरपंच रजनी कुबडे यांनी ‘ये शहाणे शांत बस! असे असंवैधानिक भाषेत सुनावल्याने प्रिया राऊत आणि अन्य विरोधी सदस्य आक्रमक झाले. विरोधी सदस्य दीपक पंचभाई, उत्तम पोटोडे, लक्ष्मण युवनाते, सुनीता कोठे, दीपाली इंगोले, प्रिया राऊत, दुर्गा चरपे यांनी सामान्य फंडातील कामाच्या नियोजनाचा विषय मासिक सभेत चर्चेत न घेता सत्ताधारी परस्पर नियोजन करतात. नियोजित कामे विरोधकांना बाहेरून माहिती होतात, हे लोकशाहीत अपेक्षित नसल्याचे सांगितले आहे.
कोट
ग्रामपंचायतीमधील सर्वच सदस्य जनतेतून निवडून आलेले आले. जनहिताच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठीच मासिक सभेचे प्रावधान आहे. आमचा हा हक्क कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, तसे झाल्यास आम्हीही शांत बसणार नाही.
प्रिया राऊत
सदस्या, ग्रामपंचायत, बेनोडा.