खादी कापडाला आले सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:35 PM2019-04-10T13:35:07+5:302019-04-10T13:35:34+5:30
उन्हाळ्याचे दिवस व खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांसह युवक, कार्यकर्ते गर्दी करीत असल्याचे बाजारात दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. गाव-खेड्यांत प्रचाराचे भोंगे वाजू लागलेत. अशातच उन्हाळ्याचे दिवस व खास प्रचारासाठी खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांसह युवक, कार्यकर्ते गर्दी करीत असल्याचे बाजारात दिसून आले.
निवडणुकीचे तंत्र-मंत्र सगळेच बदलले आहे. मात्र अनेक वर्षांपासून खादीचे महत्त्व आजही कायम आहे. खादीमध्ये गांधी खादी, बंगाली, पांढरी शुभ्र खादीच्या शर्ट, दुपट्ट्याला मागणी वाढली आहे. याशिवाय कापडाचीही मागणी बऱ्यापैकी आहे. यामध्ये युवा कार्यकर्त्यांनी नेहरू शर्टला पंसती दर्शविली आहे.
विविध रंगांमध्ये खादीचे कपडे उपलब्ध आहेत. प्रचारामध्ये राजकीय मंडळी पांढऱ्या रंगाच्या खादीला अधिक पसंती देत असल्याने येथील खादी ग्राम एम्पोरियममधून खादीच्या पांढºया खादी कपडाची मागणी समाधानकारक असल्याचे व्यवस्थापक राजू गौतम यांनी सांगितले.
खादीचा कपडा घेऊन पोशाख शिवून घेण्यासाठी ग्राहकाचा कल वाढला असल्याचे टेलर सुधीर मेश्राम यांनी सांगितले. त्यामुळे खादीचा नेहरू शर्ट, कॉटनचा पुणा पॅन्ट हा खास पोशाख पसंतीत आहे. निवडणूक लक्षात घेता कार्यकर्ते विविध रंगांच्या नेहरू शर्टला पसंती देत आहेत.
खादी विक्रेत्या दुकानांसह बाजारात विविध शर्ट, दृपट्टे बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. त्यावर विविध पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या उड्या पडत आहेत.
खरेदीकडे कल, उन्हापासून बचाव
जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. ४३ अंशांपर्यंत पारा चढत आहे. खादीचे कपडे परिधान केल्याने उन्हापासून बचाव होतो. यामुळे रेडिमेडच्या जमान्यातील खादीचे कपडे शिवून घेण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांसोबतच ग्राहकांचा कल वाढला आहे.
उमेदवारांना लोकसभा निवडणुकीच्या खर्चाच्या मर्यादा आहेत. लोकसभा निवडणूक असली तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत खादीची मागणी कमी झाल्याचे दिसत आहे. केवळ निवडणुकीमुळे नव्हे तर उन्हाळ्यातसुद्धा खादीला ग्राहकांकडून पसंती मिळते.
- राजीव गौतम
संचालक, खादी एम्पोरियम