खाकीला फासला काळिमा; बलात्कारानंतर बनविली ब्ल्यू फिल्म!
By प्रदीप भाकरे | Published: May 9, 2023 06:59 PM2023-05-09T18:59:07+5:302023-05-09T18:59:33+5:30
Amravati News एका महिलेसोबत ठेवलेल्या संबंधांची ब्ल्यू फिल्म बनवून तिला धमकावण्याचा प्रकार एका पोलीस चालक शिपायाने केल्याची धक्कादायक घटना येथे घडली.
अमरावती : पतीपासून विभक्त होऊन माहेरी राहणाऱ्या एका महिलेला लग्न करण्याचे, प्लॉट घेऊन देण्याची बतावणी करून प्रेमजाळ्यात ओढण्यात आले. त्याने शहरातील विविध लॉजमध्ये नेऊन त्या महिलेशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. आरोपी पोलिस एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेशी केलेल्या शरीरसंबंधांची ब्ल्यू फिल्मदेखील बनविली. खाकीला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार शहर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी ८ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपी अजय उदयभान सरोदे (रा. प्रभू कॉलनी) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अजय सरोदे हा पोलिस चालक शिपाई असून तो शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी ही नऊ वर्षांपासून तिच्या माहेरी राहत असून तिने पतीविरुद्ध अमरावती न्यायालयात खावटीचा दावा दाखल केला आहे. काही वर्षांपूर्वी ती न्यायालयीन तारखेवर गेली असता पोलिस चालक असलेला आरोपी अजय सरोदे याच्यासोबत तिची ओळख झाली. एकमेकांशी बोलणे सुरू झाले. अशातच मागील दीड वर्षापासून त्याने पीडित महिलेला लग्न करतो, प्लॉट खरेदी करून देतो, नवऱ्याकडून खावटीचे पैसे काढून देतो, असे आमिष दाखविले. अशातच सन २०२१ च्या ऑक्टोबर महिन्यापासून त्याने पीडित महिलेला अमरावती शहरातील तीन लॉजसह वलगाव, परतवाडा, चिखलदरा येथील वेगवेगळ्या लॉजवर नेले. तेथे त्याने अनेक वेळा शारीरिक संबंध केले. ते करताना त्याने स्वत:च्या मोबाइलमध्ये फिर्यादी महिलेचे अश्लील छायाचित्रणदेखील केले.
...तर व्हायरल करीन!
बोलावल्यानंतर त्याच्यासोबत लॉजवर गेली नाही, तर ब्ल्यू फिल्म व्हायरल करतो अथवा सर्व लोकांना ती दाखवतो, अशी धमकी त्याने दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेची इच्छा नसताना आरोपी पोलिस दीड वर्षापासून तिला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घराजवळ नेहमीच येतो. तिची अजिबात इच्छा नसताना तो तिच्या आईच्या मोबाइलवर संपर्क साधून बोलण्याचा प्रयत्न करतो. हा सर्व प्रकार सहनशक्तीपलीकडे गेल्याने अखेर तिने ८ मे रोजी दुपारी आधी पोलिस आयुक्तालय गाठले. तेथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तिची आपबीती ऐकून शहर कोतवाली पोलिस ठाण्यात धाडले. तेथे सहायक पोलिस निरिक्षकांनी तिचे बयाण नोंदविले. रात्री ८:५६ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला अटक
आरोपी पोलिस चालकाला सोमवारी रात्रीच अटक करण्यात आली. तो शहर पोलिस आयुक्तालयात कार्यरत असल्याची माहिती शहर कोतवालीच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती डीसीपी विक्रम साळी यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुमेध सोनोने हे तपास व दाखल अधिकारी आहेत.