खाकी वर्दी, हातात बंदुक अन् ; सोशल मीडियावर हवा करणारा पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:00 PM2021-08-04T15:00:45+5:302021-08-04T15:02:56+5:30
अमरावतीतील या पोलिसाला हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. पोलीस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली.
अमरावती - पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोयता हातात घेऊन व्हिडिओ बनविणाऱ्या कोयता भाईची चांगलीच वरात काढली होती. त्यानंतर, या भाईने माफी मागतिल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर झाला होता. त्यामुळे, पोलिसी खाक्या दाखवताच भाईगिरी, दबंगगिरी पळून गेल्याचं दिसून आलं. मात्र, आपल्या वर्दीचा धाक दाखवत पोलीसच अशी भाईगीरी करत असेल तर याला काय म्हणायचं. अमरावतीमधील अशा एका पोलिसाला गैरकृत्याबद्दल निलंबित करण्यात आलं आहे.
अमरावतीतील या पोलिसाला हातात पिस्तुल घेऊन व्हिडीओ करणं चांगलंच महागात पडलं आहे. पोलीस अंमलदार महेश मुरलीधर काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलीस महेश मुरलीधर काळे यांनी हा व्हिडीओ केला होता. पोलिसाच्या खाकी वर्दीत हातात पिस्तुलासारख्या शस्त्राचा वापर करुन, बुलेटवरुन काही डायलॉग असलेला व्हिडीओ त्यांनी तयार केला होा. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर, अनेकांनी पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
महेश काळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी बेशिस्त आणि गैरवर्तनाबद्दल महेश काळे यांना निलंबित केलं आहे. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हवा करणाऱ्यांची कमी नाही. पण, पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना आपण आपलं भान जपलं पाहिजे. लोकांनी पोलीस हे आपल रक्षणकर्ते वाटले पाहिजे, कुठल्या साऊथ इंडियन चित्रपटातील खलनायक नाही.