वाशिमचे मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्याने पळविले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 01:53 PM2018-09-15T13:53:38+5:302018-09-15T14:02:02+5:30
केंद्र शासनाच्या रूसा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्यातील खम्मम येथे नेण्यात आले आहे.
अमरावती - केंद्र शासनाच्या रूसा योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज तेलंगणा राज्यातील खम्मम येथे नेण्यात आले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात राज्य शासनाकडे मुदतीत सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) सादर केला नाही. त्यामुळे रूसाने ३० जुलै २०१८ रोजी झालेल्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. एवढेच नव्हे मॉडेल कॉलेज निर्मितीसाठी मंजूर १२ कोटी रुपयांचे अनुदान देखील रद्द केले आहे.
अमरावती विद्यापीठात ५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत कार्यक्रम पत्रिकेवरील अनुक्रमांक ९८ नुसार रूसा योजनेंतर्गत वाशिम येथे प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेज साकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने मॉडेल कॉलेजसाठी जागा शोधणे, स्थळनिश्चिती करणे, पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात त्रिसदस्यीय समितीचे गठण करण्यात आले. मात्र, आता हे मॉडेल कॉलेज रूसाच्या ‘पीएबी’ने तेलंगणा राज्यात मंजूर केल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आशांवर विरजण पडले.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने वाशिम जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांना १३ मे २०१८ पर्यंत मॉडेल कॉलेजसंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे पत्राद्वारे कळविले होते. त्यानंतर महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी व प्रस्तावाची शिफारस करण्यासाठी समिती गठीत झाली. या प्रस्तावाची माहिती राज्य शासनाच्या रूसा कार्यालयाकडे १५ मे २०१८ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे. मात्र, रूसाच्या ‘पीएबी’कडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून वाशिम येथे प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात २५ जून २०१८ पर्यंत ‘डीपीआर’ सादर करण्यात आला नव्हता, ही बाब बैठकीत स्पष्ट झाली आहे. केंद्र सरकारने रूसा अंतर्गत राज्यात पालघर आणि वाशिम येथे दोन नवीन मॉडेल सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा निर्गमित करण्यात आली होती. मात्र, अमरावती विद्यापीठाच्या लेटलतिफीमुळे वाशिम येथे नवीन मॉडेल कॉलेज तूर्तास सुरू करता येणार नाही, असे संकेत आहेत.
वाशिम येथील प्रस्तावित नवीन मॉडेल कॉलेजसंदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग स्तरावर कार्यवाही करण्याबाबत गत आठवड्यात संचालक श्रीकांत माने यांनी कळविले आहे. आता राज्य शासन निर्णय घेणार आहे. मॉडेल कॉलेज साकारण्यासाठी विद्यापीठस्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे.
- मंगेश वरखेडे, संचालक, विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ