खापर्डे वाड्यातील माती, कचरा अखेर मनपाने उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 10:37 PM2018-01-16T22:37:38+5:302018-01-16T22:38:33+5:30
श्रीमंत दादासाहेब खापर्डेंचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत येथे शेगाव निवासी योगिराज संत गजानन महाराजांनी भेट दिली होती.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डेंचा वाडा हा ऐतिहासिक ठेवा आहे. दादासाहेब खापर्डे यांच्या हयातीत येथे शेगाव निवासी योगिराज संत गजानन महाराजांनी भेट दिली होती. त्यांच्या स्पर्शाने पुनित झालेल्या या वाड्याला अनेक देशभक्तांनीही स्वातंत्र्यपूर्व काळात भेट दिली. अलीकडे या वाड्याच्या प्रांगणात केरकचरा व माती साचल्याने परिसर विद्रुप झाला होता. महानगरपालिकेने मंगळवारी हा परिसर स्वच्छ केला.
वाड्याचा काही भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे येथे माती, विटा व कचरा साचला होता. परिसरातील व्यापारी या ठिकाणी केरकचरा टाकत असल्याने घाणीचे साचले होते. भाविक मात्र श्रद्धेने दर गुरुवारी येथे आरती व पूजा करतात. त्यामुळे महानगरपालिकेने हा कचरा उचलावा, अशी भाविकांची इच्छा होती. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. २० जानेवारी रोजी या ठिकाणी ‘श्रीं’ची येथे पालखी येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेला उशिरा का होईना जाग आली. स्वच्छता विभागाने या ठिकाणी साचलेली घाण, माती व इतर टाकाऊ वस्तू उचलल्या आणि जागा स्वच्छ केली. तीन ते चार ट्रक माती या ठिकाणी निघाली. परिसर स्वच्छ करण्यात आल्याने भाविकांनी मनपाच्या बांधकाम व आरोग्य विभागाचे आभार मानले.