7.28 लाख हेक्टरमध्ये खरीप हंगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 05:00 AM2021-06-07T05:00:00+5:302021-06-07T05:00:31+5:30
यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र २४ तासांवर आले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता १५ जूनपर्यत पेरणी नकोच, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, ७.२८ लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरणीसाठी बियाणे बाजारात सध्या धूमशान सुरू आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एकूण पेरणी क्षेत्राच्या ३७ टक्के म्हणजेच २.७० लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आहे. ‘कॅश क्राप’ या अर्थाने दरवर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढतच आहे व परतीच्या पावसाने काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने सोयाबीनमध्ये आंतरपीक महत्त्वाचे ठरत आहे. याशिवाय २.५२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचे पीक प्रस्तावित आहे. सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.
तुरीचे पीक जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा १.३० लाख हेक्टर प्रस्तावित असले तरी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय २० हजार हेक्टरमध्ये मूग व १० हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, ६० दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असल्याने शेतकरी आश्वस्त आहेत. याशिवाय २२ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, चार हजार हेक्टरमध्ये धान, १५ हजार हेक्टरमध्ये मका व सहा हजार हेक्टरमध्ये इतर पिके राहतील. सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये बऱ्याचअंशी शिथिलता दिल्याने बियाणे बाजारात शेतकऱ्यांची वर्दळ वाढणार आहे.
शेतमजुरांच्याही हाताला काम मिळाल्याने सर्वत्र उत्साही वातावरण आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासणी व बीजप्रक्रिया महत्त्वाची असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
महाबीज बियाण्यांचा तुटवडा
यंदा महाबीजद्वारे सोयाबीनचे १५,३८० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बियाण्यांची मागणी १.३० लाख क्विंटल आहे. महाबीजचे बियाणे ७५ रुपये किलो, तर खासगी कंपन्यांचा १०० ते १२० रुपये किलो असा दर आहे. त्यामुळे कृषिसेवा केंद्रांमध्ये सध्या रांगा आहेत. मात्र, महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
बीटीच्या १२.५७ लाख पाकिटांची आवश्यकता
यंदाच्या हंगामात बीटी बियाण्यांच्या १२,५७,७१० पाकिटांची आवश्यकता आहे. याशिवाय सोयाबीन १५,३८० क्विंटल, संकरित ज्वारी २,२०० क्विंटल, बाजरी ०.४० क्विंटल, मका २,४०० क्विंटल, तूर ५,४६० क्विंटल, मूग ९६० क्विंटल, उडीद ८४० क्विंटल, भुईमूग ४५० क्विंटल, सूर्यफूल ५ क्विंटल असे बियाणे लागणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
कृषी विभागाचा सल्ला मोलाचा
जमिनीत किमान सात इंच ओल किंवा १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. बियाणे महाग आहे. त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी १५ ते १७ जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी व बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी. याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यांसारखे पीकदेखील फायदेशीर असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.