३१ मे पूर्वी खरिपाचे पीक कर्जवाटप
By admin | Published: April 9, 2017 12:12 AM2017-04-09T00:12:40+5:302017-04-09T00:12:40+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी अतिशय कमी पीक कर्ज वाटप करण्यात आले त्यामुळे यावर्षी ३१ मे पुर्वी पीक कर्ज मागणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे ....
किशोर तिवारी : मिशनची आढावा बैठक
अमरावती : जिल्ह्यात मागील वर्षी अतिशय कमी पीक कर्ज वाटप करण्यात आले त्यामुळे यावर्षी ३१ मे पुर्वी पीक कर्ज मागणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे तसेच आतापर्यंत कधीही पीककर्ज न घेतलेल्या ९३ हजार शेतकऱ्यांपैकी किमान ५० हजार नवीन शेतकऱ्यांना बँकेच्या प्रवाहात आणून पीककर्ज द्यावे, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
नियोजन भवन येथे शनिवारी जिल्ह्याची आढावा बैठक किशोर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, विभागीय कृषी सहआयुक्त सु.रा. सरदार, वीज वितरण कंपनी अमरावतीचे मुख्य अभियंता रंगारी उपस्थित होते. जिल्ह्यात ४ लाख १५ हजार खातेदार असतांना मागील वर्षी १ लाख ६५ हजार शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी नवीन शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज शेतीसाठी कसे उपलब्ध होईल यासाठी लिड बँकेने प्रयत्न करावे. त्यासाठी ३१ मे पूर्स्वी सर्व बँकांनी शाखानिहाय पीक कर्ज वाटप मेळावे घ्यावे. १५ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत बँकेचे अधिकारी सुट्टीवर जाणार नाही याची खबरदारी लिड बँकेने घ्यावी, असे तिवारी यांनी सांगीतले आहे. (प्रतिनिधी)