खरपी अचलपूर तालुक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:38 PM2019-06-10T22:38:55+5:302019-06-10T22:39:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार ...

Kharipi in the Achalpur taluka | खरपी अचलपूर तालुक्यात

खरपी अचलपूर तालुक्यात

googlenewsNext
ठळक मुद्देमुक्तागिरीच्या प्रवेशद्वारालगतचे गाव : चांदूर बाजार तालुक्यातून बाद

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मध्य प्रदेश सीमारेषा आणि जैन धर्मियांचे तीर्थस्थान असलेल्या मुक्तागिरीच्या प्रवेशद्वारावरील खरपी गावाचा समावेश चांदूरबाजार तालुक्यातून अखेर अचलपूर तालुक्यात झाला आहे. येथील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना आपला तालुका कोणता लिहायचा, या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अध्यादेशातून मिळाले आहे.
विद्यार्थ्यांना आता शाळेच्या फलकावर सोडलेल्या तालुक्याच्या कोऱ्या जागेवर तालुका अचलपूर, असे लिहिता येणार आहे. दुसरीकडे चांदूरबाजार तालुक्यातील २९०५ नागरिकांचा समावेश आता अचलपूर तालुक्यात झाला आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ‘सांगा आमचा तालुका कोणता?’, नागरिकांना पडला प्रश्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते.
शासन राजपत्र अधिसूचनेद्वारे २१ जानेवारी २०१४ पासून अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्याच्या चतुर्सिमेत बदल करून खरपी हे गाव चांदूरबाजार तालुक्यातून वगळून अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३० मे रोजी आदेश धडकले. चांदूर बाजार तालुक्यातील खरपी ग्रामपंचायतीचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यासाठी येथील ग्रामपंचायतीसह गावकऱ्यांनी प्रशासनाला आवश्यक सर्व दस्तऐवज, अर्ज आदी शासकीय बाबी केव्हाच पूर्ण केल्या. खरपी येथे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, तलाठी दप्तर आदी असून तीन हजार लोकसंख्या, तर मतदारसंख्या दोन हजारांवर आह. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनीही खरपीवासीयांना अचलपूर तालुक्यात समाविष्ट करण्यासाठी शासनाला पत्र दिले होते. त्यावर आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तहसील यंत्रणेकडून खरपी गावाच्या सर्व दस्ताऐवजांवर चांदूर बाजारऐवजी अचलपूर तालुक्याचा उल्लेख यापुढे होणार आहे.
शाळेच्या फलकावर होणार तालुका बदल
खरपी हे गाव ५० वर्षांपूर्वी अचलपूर तालुक्यात होते. त्यानंतर त्याचा समावेश चांदूरबाजार तालुक्यात करण्यात आला. मात्र, हा निर्णय नागरिकांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास देणारा ठरला. त्यामुळे अचलपूर तालुक्यातच खरपीचा समावेश व्हावा, या मागणीच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपूर्वी कारवाईला सुरुवात झाली. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या फलकावर तालुक्याचे नाव खोडण्यात आले होते. आता या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
३० किमीचा नाहक त्रास
परतवाडा शहरापासून खरपी सात किलोमीटर अंतरावर आहे. चांदूर बाजारचे अंतर ३० किलोमीटर आहे. नागरिकांना कुठल्याही शासकीय कामासाठी साठ किलोमीटरचा आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत होता. या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

खरपी गावाचा सर्व प्रशासकीय व्यवहार अचलपूर तालुक्यातून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार खरपी गावाचा समावेश अचलपूर तालुक्यात करण्यात आला आहे. सर्व शासकीय व्यवहार आता अचलपूर तालुक्यातून सुरू झाले आहे.
- निर्भय जैन,
तहसीलदार, अचलपूर

Web Title: Kharipi in the Achalpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.