१७ वर्षांनंतर खावटी कर्ज अनुदानाचे वाटप होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:12 AM2021-07-30T04:12:38+5:302021-07-30T04:12:38+5:30
धारणी : मेळघाटातील आदिवसींचा पावसाळ्यात जगापासून संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांना यंदा तब्बल १७ वर्षांनंतर खावटी कर्ज अनुदान योजनेचा लाभ ...
धारणी : मेळघाटातील आदिवसींचा पावसाळ्यात जगापासून संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांना यंदा तब्बल १७ वर्षांनंतर खावटी कर्ज अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी आमदार राजकुमार पटेल यांनी पाठपुरावा केला.
मेळघाटातील आदिवासी जनतेला आदिवासी विकास महामंडळामार्फत दरवर्षी खावटी कर्ज अनुदान योजना राबविले जात होती. मात्र, २००४ पासून ही योजना पूर्णपणे स्थगित ठेवण्यात आली होती. या योजनेवर पावसाळ्यात आदिवासी बांधवांना खावटी कर्ज वाटप करण्यात येत असे. या योजनेंतर्गत दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपयांचे साहित्य स्वरूपात कर्ज अनुदान दिले जात होते. आमदार राजकुमार पटेल यांनी ही योजना सुरू व्हावी म्हणून पाठपुरावा केला. यावर्षी या योजनेवर अनुदान रक्कम आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्याशी चर्चा करून ती मंजूर करून घेतली आहे. या योजनेंतर्गत एकूण ५५ हजार ४६९ लाभार्थींना ८ कोटी ८७ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती राजकुमार पटेल यांनी दिली. त्याचप्रमाणे ही लाभार्थिसंख्या वाढविण्यासाठी नवीन लाभार्थींची नोंदणी प्रकल्प कार्यालयामार्फत सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पावसाळ्यात आता आदिवासींना खावटी कर्ज अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.