अपहृत चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:37 AM2021-02-20T04:37:28+5:302021-02-20T04:37:28+5:30

अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण मार्गावरून ताबा घेतला. ...

Kidnapped Chimukala safe in Ahmednagar | अपहृत चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप

अपहृत चिमुकला अहमदनगरमध्ये सुखरूप

Next

अमरावती : शारदानगरमधून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय मुलाचा राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अहमदनगर येथे कल्याण मार्गावरून ताबा घेतला. अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने याप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींसह या चिमुकल्याला शनिवारी शहरात आणले जाईल. मुलाच्या अपहरणाने सैरभैर झालेल्या आई-वडिलांना तो सुखरूप असल्याच्या वार्तेने दिलासा मिळाला. आता त्याच्या वाटेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

पोलीस सूत्रांनुसार, हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकीजवळ, कोठला, अहमदनगर), अलमस ताहीर शेख (१८, रा. कोठला, अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर, अहमदनगर), फैरोज रशीद शेख (२५, रा. कोठला, अहमदनगर) अशा चौघांना जणांना अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरातून मुलाचे अपहरण झाल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी माहिती दिली. त्यांच्या आदेशावरून तेथील अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आगरवाल तसेच पोलीस निरीक्षक अनिल कटके, एपीआय मिथून घुगे, पीएसआय गणेश इंगळे यांच्यासह गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी राजापेठ पोलिसांना सहकार्य केले.

अन्य एक आरोपी आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला, अहमदनगर) याच्या शेवगाव (जि. अहमदनगर) याच्या घरी अपहृत चिमुकल्याला ठेवल्याची प्राथमिक माहिती गुन्हे शाखा व राजापेठ पोलिसांना मिळाली होती. दोन्ही पथके त्याच्या घरी धडकली. पोलीस आल्याची माहिती मिळताच तो पळून गेला.

दरम्यान, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इतर दोघांकडे चिमुकला असल्याची माहिती दिली. त्यावरून कल्याण मार्गावर सापळा रचण्यात आला. या मार्गाने दुचाकीने मुलांना घेऊन जात असताना आसिफ हिनायत शेख व फैरोज रशीद शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव, राजापेठचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्यासह राजापेठ पोलिसांच्या चार व गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी या घटनेचा छडा लावला.

बॉक्स:

आजीवर संशयाची सुई

चिमुकल्याचे अपहरण झाले तेव्हा त्याच्यासोबत आजी होती. त्यामुळे गुरुवारी त्यांचे बयाण नोंदवून शुक्रवारी सकाळपासून कसून चौकशी केली. आरोपी हिनाला ती ओळखत असल्याचे तसेच तिचेही माहेर अहमदनगर पुढे आले. त्यामुळे अपहरणामध्ये आजीचा तर सहभाग नाही ना, यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत.

-----------

अहमदनगर शहरातून चार आरोपींना ताब्यात घेतले. यात अपहरण करणाऱ्या दोन आरोपींचाही समावेश आहे. खंडणीसाठी अपहरण केले असावा, त्या दिशेने तपास सुरू आहे. मुलाच्या आजीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आरती सिंह, पोलीस आयुक्त

Web Title: Kidnapped Chimukala safe in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.