‘त्या‘ दोन युवकांनी केला अपहरणकर्त्यांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:41+5:302021-02-20T04:36:41+5:30
(फोटो मनिष तसरे) अमरावती : चार वर्षीय मुलाचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बुधवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास राजापेठ ठाणे हद्दीतील ...
(फोटो मनिष तसरे)
अमरावती : चार वर्षीय मुलाचे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बुधवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास राजापेठ ठाणे हद्दीतील शारदानगर परिसरातून अपहरण केले होते. याची माहिती मिळताच मुलाच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन युवकांनी अपहरणकर्यांचा पाठलाग केला. मात्र, आरोपी त्यांना हुलकावणी देऊन रविनगरच्या दिशेने निघून गेले. त्या दोघांनी तातडीने राजापेठ पोलिसांना घटनेची माहिती दिल्याची बाब ‘लोकमत’ प्रतिनिधींनी तरुणांशी केलेल्या चर्चेतून समोर आली.
अमय मानेकर व मोहित अग्रवाल असे आरोपीचा पाठलाग करणाऱ्या धाडसी युवकांचे नाव आहे. बुधवारी रात्री शारदानगरस्थित शिवपार्वती करमकर स्मृती संचालित मुधोळकर पेठ महिला मंडळ शाळा (लाटेबाई शाळा) समोर चार वर्षीय मुलगा आजीसोबत खेळत होता. सोबत त्याच्या आठ व नऊ वर्षीय दोन चुलत बहिणीसुद्धा होत्या. त्या सायकल चालवित असताना व आजी फोनवर बोलत असतानाच अचानक दुचाकीवर आलेल्या एकाने आजीच्या पाठीमागून धावत येऊन त्या मुलाला उचलले आधीच दुचाकीवर सज्ज असलेल्या महिलेजवळ देऊन आरोपी रविनगरच्या दिशेने पळून गेला. हा प्रकार मुलाच्या बहिणीच्या लक्षात येताच तिने धाडसी वृत्तीने काही अंतरापर्यंत आरोपीचा पाठलाग केला. पण, ती लहान असल्याने तिला आरोपीपर्यंत पोहचता आले नाही. ती रडत आजीजवळ आली. आपल्या भावाला कुणीतरी पळवून नेल्याचे सांगून दोन्ही बहिणी रडायला लागल्या.
त्यानंतर घडलेला हा प्रकार आजीच्या मदतीने शाळेसमोरच राहणाऱ्या पराग नावाच्या मुलाला सांगितला. तोसुद्धा आरडाओरड करून घराबाहेर पळत सुटला. मुलाच्या घराच्या काही अंतरावरच राहणाऱ्या मोहित अग्रवाल व अमन मानेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता, दुचाकीने पन्नालालनगरकडे आरोपीचा पाठलाग केला. मात्र तेथे आरोपी दिसून न आल्याने गांधी चौकात पोलीस कर्तव्यावर असतात म्हणून गांधी चौकाकडे धाव घेतली. मात्र, तेथे पोलीस दिसले नाही. नंतर राजकमल चौकाच्या दिशेने कूच केली. येथे सिग्नलवर अडकल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र, नजीकच असलेल्या राजापेठ पोलिसांना माहिती देण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी तरुणांना दिला व सिग्नल सुटण्यापुर्वीच त्यांच्या दुचाकीला पुढे जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे दोन्ही तरुणांनी मुलाचे अपहरण झाल्याची माहिती राजापेठ पोलिसाना दिली. त्यामुळे पोलीस अर्लट झाले व त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांच्या सर्तकतेमुळे अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावण्यास पोलिसांना प्राथमिक मदत झाली.
बॉक्स:
अपहरणापूर्वी मानेकर काकांनी दिले मुलाला चॉकलेट
परिसरात सर्वांचा लाडका असलेला चार वर्षीय मुलगा हा नेहमीच परिसरातीलच प्रमोद मानेकर काकांकडे यायचा. घराशेजारीच गल्लीतून आजीसोबत रोज बाहेर जाण्याचा त्या मुलाचा नित्यक्रम होता. त्यामुळे तो मानेकर काकांकडे आला. त्यानंतर त्यांनी त्याचा लाड करून चॉकलेट दिले. मुलगा आजीसोबत पुढे गेला. काही वेळातच दोघांनी त्याचे अपहरण केल्याची माहिती मानेकर काकांना मिळताच त्यांनाही धक्काच बसला.