शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तरुणाचे अपहरण
By admin | Published: February 6, 2017 12:03 AM2017-02-06T00:03:41+5:302017-02-06T00:03:41+5:30
महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अन्य एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला.
वडाळी नाका परिसरातील घटना : फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती : महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अन्य एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला.
याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी वर्षा दिलीप भोयर यांच्या तक्रारीवरून प्रतिभा बोपशेट्टी, त्यांचा मुलगा बंटी (दोघेही राहणार महादेव खोरी) तसेच हेमंत कोडापे, पुनम कोडापे (दोन्ही राहणार वडाळी नाका) यांच्यासह दोन अज्ञातांविरुध्द गुन्हा नोंंदविला आहे. अपहरणाची ही घटना ३ फेबु्रवारीला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वर्षा भोयर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तथा शिवसेना महिला आघाडीच्या विद्यमान जिल्हाध्यक्षा आहेत. भोयर यांच्या तक्रारीनुसार, महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून ३ फेबु्रवारी रोजी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोयर यांचा मुलगा आवेश (२०) याचे अपहरण करून त्याला वडाळी नाक्याजवळील एका खोलीत डांबून ठेवले. दरम्यान अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत आवेशने घर गाठले. तथा हा प्रकार त्याची आई वर्षा भोयर यांच्या कानावर घातला. रविवारी या घटनेची तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३६३, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. २१ फेब्रवारीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी वर्षा भोयर यांनी एसआरपीएफ प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी मागीतली होती. त्यांनी नामांकनही दाखल केले.
ऐनवेळी बदलला उमेदवार
अमरावती : शुक्रवारी दुपारी भोयर यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेचा बी फार्म प्रतिभा बोपशेट्टी यांना देण्यात आला. त्यामुळे भोयर यांची उमेदवारी अपक्ष म्हणून गणल्या गेली. बी फार्म वरून शुक्रवारी दुपारी अंबापेठ झोन कार्यालयात भोयर आणि बोपशेट्टी यांच्यात शाब्दिक वादही झाला होता. त्या पार्श्वभूमिवर भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीने राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान याप्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील खराटे यांच्यावर भोयर यांनी उमेदवारी कापल्याचा आरोप केला असून खराटे यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.
शिवसेनेच्या महानगर प्रमुखावर आरोप
शिवसेनेचे महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी आपल्याला कोरा बी फार्म दिला. शुक्रवारी दुपारी बी फार्म दाखल करतेवेळी ही बाब आपल्या लक्षात आली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्तृत्वाला आपल्याऐवजी बोपशेट्टी यांनाच उमेदावारी द्यायची होती. हे बी फार्ममधील गोंधळाने स्पष्ट झाल्याचा आरोप वर्षा भोयर यांनी केला आहे. याबाबत आपण खा. अरविंद सावंत आणि खा. आनंद अडसुळ यांच्याकडे तक्रार करणार असल्याच्या भोयर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिवसेनेच्या उमेदवारीवरुन दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. वर्षा भोयर यांच्या तक्रारीवरुन आरोपी महिला पदाधिकाऱ्यांविरुध्द अपहरणाचा गुन्हा नोंदविला. चौकशीअंती अटकसत्र सुरु करण्यात येईल.
- पंजाब वंजारी, पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे.