किडनीदानातून वडिलांनी दिली मुलाला संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 01:09 AM2019-02-23T01:09:43+5:302019-02-23T01:11:31+5:30
मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मूत्रपिंड निकामी झालेल्या आपल्या तरुण मुलाला वडिलांनी किडनीदान करून मृत्यूच्या दारातून खेचून जीवदान दिले. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. अलीकडच्या काळातील विभागातील ही सहावी यशस्वी शस्त्रक्रिया आहे.
स्थानिक पवननगर येथील रहिवासी वैभव रुमाकांत खैरकर (२६) हा चार वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होता. तो १० महिन्यांपासून सुपर स्पेशालिटीमध्ये नियमित डायलिसिस घेत होता. वैभवचे प्राण वाचविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्यामसुंदर निकम, विशेष कार्य अधिकारी डॉ. टी.बी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. रुमाकांत आत्माराम खैरकर (५५) हे किडनी देण्यास योग्य असल्याचे विविध चाचण्याअंती निष्पन्न झाले. त्यांनी पुत्रप्रेमापोटी किडनीदानाला लगेच होकार दिला. त्यानंतर नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यूरोलॉजिस्ट डॉ.संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ.निशांत बावनकुळे, यूरोसर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. निखिल बडनेरकर, डॉ. विक्रम कोकाटे, डॉ. सौरभ लांडे, डॉ. राजेश कस्तुरे, डॉ. रामप्रसाद चव्हाण, डॉ. प्रणीत घोनमोडे, डॉ. रवि भूषण, डॉ. विजय सोनपरोते, डॉ. अभिजित दिवेकर आदींच्या उपस्थितीत शुक्रवारी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. कायदेशीर प्रक्रियेकरिता डॉ. सोनाली चौधरी, नवनाथ सरवदे, सतीश वडनेरकर यांनी मोलाची भूमिका पार पडली.
आर्थिक परिस्थिती बेताची
रुमाकांत खैरकर यांचे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वैभववरील उपचारासाठी अनेक खस्ता खाव्या लागल्या. प्लास्टिकचे छोटेसे दुकान चालविणाऱ्या रुमाकांत यांच्यावर प्लास्टिकबंदीने बेरोजगारीची कुºहाड कोसळली. त्यांच्यासमोर वैभवच्या औषधोपचारासाठी लागणाºया खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्यावर मात करत वैभवला नवजीवन दिले.
वैभव खैरकर हा सातवीत असताना त्याच्या आईचे अर्थात रुमाकांत खैरकर यांच्या पत्नीचे निधन झाले. चौदा-पंधरा वर्षांपासून रुमाकांत हेच आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडीत आहेत. त्यांनीच आईच्या प्रेमाला पारखा झालेल्या वैभवचे पालनपोषण केले. तोच वैभव अंथरुणाला खिळल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. कुठलाही किंतु-परंतु न बाळगता त्यांनी वैभवला किडनी दिली.