मेळघाटातील ३० गावांमध्ये किरसान मोहा बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:15 AM2021-08-22T04:15:57+5:302021-08-22T04:15:57+5:30
धारणी : आदिवासींच्या समृद्धीचा मार्ग ठरू शकणाऱ्या किरसान (लखपती) मोहा बँक मेळघाटातील तब्बल ३०० गावांमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत स्थापन ...
धारणी : आदिवासींच्या समृद्धीचा मार्ग ठरू शकणाऱ्या किरसान (लखपती) मोहा बँक मेळघाटातील तब्बल ३०० गावांमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत स्थापन करू. त्यासोबतच आदिवासींना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी प्रकल्प कार्यालय तसेच धारणी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केली आहे. पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत मेळघाट विकासदूत यांना सतत काम उपलब्ध करून देण्याची आवश्यकताही त्यांनी स्पष्ट केली.
सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अभिनव संकल्पनेतून मेळघाटामधील प्रत्येक गावात किरसान (लखपती) मोहा बँक कार्यान्वित करण्याचे ठरविले आहे. याकरिता ११ व त्याहून अधिक लोकांचा गट कार्यान्वित करण्यात येईल. मोह संकलीत करून आर्थिक उत्पन्न वाढवने तसेच विविध शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधुन लखपती बनविण्याचा उद्देश यामागे आहे. मोहा बँकेमार्फत विविध शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत देण्यात येईल. याशिवाय विविध योजनांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधा लोकांपर्यंत योग्य तऱ्हेने पोहोचत आहेत वा नाही, या बाबीची पाहणीही मोहा बँक करेल. वेळोवेळी मोहा बँक प्रतिनिधी अर्थात मेळघाट विकासदूत हे स्थानिक पातळीवरील समस्या व योजना लोकांपर्यंत पोहचविण्यास येणाऱ्या अडचणीविषयी माहितीचे आदान प्रदानाचे केंद्र म्हणून भूमिका साकारणार आहेत. याद्वारे आदिवासींच्या स्थलांतरणास आळा बसेल. पर्यायाने कुपोषण या भीषण समस्येवर मात करता येईल.
----------------
बेरोजगारीला आळा
आजपर्यंत मेळघाटात एकूण ३० गावांमध्ये किरसान मोहा बँक स्थापन करण्यात आलेल्या आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत या गावांमध्ये विविध प्रकारची कामे प्राधान्याने सुरू करण्यात येऊन गावातील बेरोजगाराची समस्या सुटण्यास मदत होईल, असे मत वैभव वाघमारे यांनी मांडले आहे.