दुकानासमोरच कीर्तन

By admin | Published: April 25, 2017 12:05 AM2017-04-25T00:05:55+5:302017-04-25T00:05:55+5:30

नंदा मार्केटस्थित देशी दारू दुकान व राज प्लाझा बार व रेस्टॉरंट कायमस्वरुपी बंद करण्यासाठी सोमवारी नागरिकांनी दारू दुकानासमोरच कीर्तन केले.

Kirtan in front of the shop | दुकानासमोरच कीर्तन

दुकानासमोरच कीर्तन

Next

नंदा मार्केटमधील दुकानासमोर आंदोलन : आ. अनिल बोंडेंचे नेत्तृत्व
अमरावती : नंदा मार्केटस्थित देशी दारू दुकान व राज प्लाझा बार व रेस्टॉरंट कायमस्वरुपी बंद करण्यासाठी सोमवारी नागरिकांनी दारू दुकानासमोरच कीर्तन केले. पश्चात आ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्त्वात नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्यासह शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले.
राज्य महामार्गापासून पाचशे मीटरपर्यंतच्या दारूबंदी निर्णयानंतर जिल्ह्यात मद्यपींची तारांबळ उडाली. बहुतांश मद्यपींनी शहरातील अंतर्गत मार्गावरील मद्य विक्री दुकानावर गर्दी केल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक राजापेठ ते दस्तुरनगर रोडवरील नंदा मार्केटजवळ असलेल्या देशी दारू व राज प्लाझा बार व रेस्टारेंट या दोन्ही मद्यविक्री प्रतिष्ठानात येणाऱ्या ग्राहकांचा त्रास परिसरातील नागरिकांना जाणवायला लागला. मद्य खरेदीकरीता ग्राहकांची संख्या वाढल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. त्या पार्श्वभूमिवर सोमवारी दुपारी या दारू दुकानांसमोर कीर्तन करण्यात आले. दारू दुकानांसमोरील वाढत्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न निर्माण झाला. मद्यपी नागरिकांच्या घरात शिरायला लागले. महिलांना अश्लिल शिवीगाळ व त्रास देऊ लागल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. प्रभागाचे नगरसेवक प्रशांत वानखडे यांच्यासह दंडे प्लॉट, चौबळ प्लॉट व सबनिस प्लॉटमधील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून दारु व्यावसायिकांना पाठबळ मिळत असल्याचे लक्षात येताच कीर्तनाच्या माध्यमातून अभिनव मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी शेकडो नागरिक सोमवारी दारू दुकानासमोर एकत्र आले. नागरिकांनी या दोन दारु दुकानाला सिल लावले आणि दुकानासमोरच कीर्तनाचा कार्यक्रम केला. विविध भक्तीगितांच्या माध्यमातून महिला-पुरुषांनी लक्षवेधक आंदोलन केले. कीर्तन आटोपल्यानंतर आ. बोंडे व नगरसेवक वानखडे यांच्या नेतृत्त्वात शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर पोलीस आयुक्तांशीही चर्चा करण्यात आली. या भागातील ही दारू दुकाने कायमस्वरुपी बंद करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नगरसेविका पद्मजा कौंडण्य, अनिता राज, राजेंद्र महल्ले, वैशाली गोंगे, लिला गुप्ता, रिकी गुप्ता, विजया गायगोले, नंदा धनुरधारी, आर.एस.जयस्वाल, वर्षा टंडन, नेहा वेदी यांच्यासह आदी नागरिकांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)

जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला अहवाल
दारू दुकान कायमस्वरुपी बंद करण्याचे निवेदन प्राप्त होताच प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी यांनी तत्काळ पोलीस आयुक्तांच्या नावे पत्र दिले. दंडे प्लॉटस्थित दारू दुकान व बारमुळे परिसरातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबतचा अहवाल पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे मागविला आहे.

Web Title: Kirtan in front of the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.