चाकूने भोसकून युवकाची निर्घृण हत्या
By admin | Published: March 26, 2016 12:13 AM2016-03-26T00:13:17+5:302016-03-26T00:13:17+5:30
रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात आणल्याच्या कारणावरून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
इंदिरानगर झोपडपट्टीतील घटना : रक्तरंजित होळी, तीन आरोपींना अटक
अमरावती : रंगपंचमीच्या दिवशी बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात आणल्याच्या कारणावरून एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी ही घटना घडली. आकाश गोपाल बाजड (२५, रा. इंदिरानगर ) असे मृताचे नाव आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत प्रकाश व रंजना कोचडे हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले.
पोलीस सूत्रांनुसार, दुर्गाविहार परिसराच्या मागील इंदिरानगर झोपडपट्टीत गुरूवारी दुपारी १ वाजता रोशन बाजड हा युवक काही युवकांना घेऊन पोहोचला. तेथे रोशन कडू हा मित्रांसह धुमाकूळ करीत रंग खेळत होते. येथील रहिवासी प्रकाश कोचडे यांनी रोशन कडूला हटकले असता रोशनने कोचड यांच्या आॅटोरिक्षा क्रमांक एम.एच. २७-सी-१९६९ च्या काचा फोडल्या. यामध्ये रोशन जखमी झाला. हा वाद विकोपाला गेला. रोशनचा भाऊ आकाश व त्याची आई प्रभा बाजडसुध्दा घटनास्थळी पोहोचले. बाजड कुटुंबीयांनी प्रकाश कोचडे व रंजना कोचडे यांच्यावर हल्ला चढविला. दोन्ही कुटुुंबीयांनी एकमेकांना मारहाण सुरू केली. बाहेरच्या युवकांना मोहल्ल्यात का आणले? या मुद्यावरून अनिल कोचडेने आकाश बाजडवर चाकूने हल्ला केला.