कौंडण्यपूरचा अस्थीघाट घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:47 PM2019-03-12T22:47:12+5:302019-03-12T22:47:36+5:30
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.
सूरज दाहाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.
केरकचरा व निर्माल्य नदीकाठालगत साचले आहे. त्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या नागरिकांना घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदीघाटावर पूजाविधी करण्यासाठी शुल्क आकारले जाते. जर शुल्क घेत असाल, तर किमानपक्षी आवश्यक सुविधा व स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी शुल्क जमा करणाऱ्यांची नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अगदी घाटाशेजारी मलबा साचला असल्याने धार्मिक विधी करण्यास लोक धजावत नाहीत.
वर्धा नदी अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही किंवा गाळही काढण्यात आलेला नाही. येथील स्वच्छता व इतर कारभाराची जबाबदारी कुणाची, हे समजायला मार्ग नाही. स्थानिक ग्रामपंचायतीचे या घाटाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. अस्थिघाटावर सुरक्षा कठडे नसल्याने लोक थेट खोल पाण्यात जातात. नदीचा उपसा झाला नसल्याने अनेक जण त्यात जाऊन फसले आणि काहींचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिक सांगतात. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत .
नागरिकांचा भ्रमनिरास
घाटावर पूजाविधीसाठी शासकीय निधीमधून मोठे सभागृह बांधण्यात आले. मात्र, त्या सभागृहात पंखे, वीज, टेबल व अन्य सुविधा नाहीत. नागरिकांना बसण्यासाठी झाडे किंवा हॉटेल शोधावे लागते. नदीपात्रात उतरल्यानंतर अनुचित प्रसंग उद्भवल्यास साधी प्राथमिक व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे या घाटावर विधी करण्यासाठी आकारलेले शुल्क कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो.
सदर अस्थिघाटाच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. घाटाची देखरेख व स्वच्छतेची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. मात्र, कंत्राटदार अधिक रक्कम घेत असेल, तर कारवाई करण्यात येईल. अस्वच्छतेबाबत त्यास जाब विचारू.
- रुचिता चव्हाण
सरपंच, कौंडण्यपूर ग्रा.पं.