मेळघाटातील कोल्हे दाम्पत्य ‘कौन बनेगा करोडपती’च्या हॉट सीटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 07:00 AM2020-12-06T07:00:00+5:302020-12-06T07:00:08+5:30
Amravati News KBC ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला.
अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त डॉक्टर कोल्हे दाम्पत्यामुळे मेळघाट पुन्हा देशपातळीवर झळकला, तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने. शुक्रवारी आणि शनिवारी या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर’ या विशेष भागात हॉट सीटवर विराजमान कोल्हे दाम्पत्याशी महानायक अमिताभ बच्चन यांनी संवाद साधला.
डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दाम्पत्याचे मेळघाटातील सामजकार्य, आदिवासींची सेवा, वैद्यकीय सेवा, लोकोपयोगी कार्यासह त्यांच्या साध्या जीवनपद्धतीवर अमिताभ बच्चन यांनी प्रकाश टाकला. त्यांची विशेष मुलाखत घेतली. यापूर्वी ‘लोकमत’ने ‘महाराष्ट्रीयन ऑफ दी इअर’ अंतर्गत कोल्हे दाम्पत्याचा गौरव केला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेत मदतीचा हातही दिला.
मेळघाटातील अतिदुर्गम बैरागड गावासह परिसरातील आदिवासींकरिता कोल्हे दाम्पत्याचे कार्य उल्लेखनीय आहे. मेळघाटातीेल समाजकार्य, वैद्यकीय सेवेतील योगदान, आदिवासींची विचारधारा आणि श्रद्धा व प्रश्नांसह आलेले अनुभव डॉ. रवींद्र कोल्हे यांनी हॉट सीटवरून महानायक अमिताभ बच्चन यांसोबत पर्यायाने देशवासीयांसोबत शेअर केले. या संवादात सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर येथे कार्यरत तत्कालीन अभियंता छोटू वरणगावकर (रा. अमरावती) या आपल्या मित्राचा बैरागडच्या अनुषंगाने हॉट सीटवरून खास उल्लेखही केला. या दोघांनीही एकमेकांच्या स्वभावाचा, आवडीनिवडीचा उलगडा याप्रसंगी केला.
कोल्हे दाम्पत्याकडून फिफ्टी-फिफ्टी
अमिताभ बच्चन यांनी कोल्हे दाम्पत्याला एकूण १३ प्रश्न विचारलेत. त्यांनी दोन लाईफ लाईनचा वापर केला. ११ व्या प्रश्नावर फिप्टी-फिप्टीचा वापर केला. बारावा प्रश्न त्यांनी माय नेम माय सिटी अंतर्गत बदलवून घेतला. यात त्यांना चिखलदऱ्यावर प्रश्न विचारला गेला. महाराष्ट्रातील ती जागा, जिथे महाभारतातील पात्र किचकाचा भीमाने वध केल्याची मान्यता आहे, असा तो प्रश्न होता. यावर कोल्हे दाम्पत्याने ‘चिखलदरा’ असे अचूक उत्तर दिले. नेमक्या या प्रश्नाच्या उत्तरातून चिखलदऱ्याची ओळख देशवासीयांपुढे आली.
बैरागड झळकले
कार्यक्रमादरम्यान मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रातील ‘बैरागड’ हे गाव महाराष्ट्रासह देशाच्या नकाशावर ठळक अक्षरात दाखवले गेले. बैरागड देशपातळीवर पोहोचले. याप्रसंगी त्यांचा मुलगा राम कोल्हेही उपस्थित होता. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या अनुषंगाने विचारलेल्या १३ व्या प्रश्नावर बाबा आमटेंच्या उत्तराने २५ लाखांवर या कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वप्ने बघा
डॉक्टरांनी पेशंटला पाठ दाखवू नये, गरजू रुग्णाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, असा सल्ला डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिला. स्वप्ने बघावीत, असा सल्ला डॉ. स्मिता कोल्हे यांनी या हॉट सीटवरून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमक्ष देशवासीयांना दिला.