कोल्हापूर, अमरावती विभाग विजेते
By admin | Published: November 9, 2015 11:15 PM2015-11-09T23:15:10+5:302015-11-09T23:19:38+5:30
राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धा : कट्टा येथे पार पडले रोमहर्षक सामने
मालवण : कट्टा (ता. मालवण) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटातून कोल्हापूर संघाने पुणे संघाचा ६३-३८ अशी २५ गुणांनी मात करत विजेतेपदावर नाव कोरले. तर मुलींच्या गटात अमरावती संघाने कोल्हापूर संघाचा अवघ्या दोन गुणांनी पराभव करत विजयश्री संपादन केली. कोल्हापूर विरुद्ध अमरावती यांच्यात झालेला अंतिम सामना रोमहर्षक झाला.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कट्टा येथील वराडकर हायस्कूल क्रीडांगणात १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय चॉकबॉल स्पर्धा ७ व ८ नोव्हेंबर या कालावधीत खेळविण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, अमरावती आणि नागपूर विभागातील राज्यभरातून सात संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत मुलांच्या गटातून द्वितीय पुणे व तृतीय मुंबई उपनगर तर मुलींच्या गटातून द्वितीय कोल्हापूर व तृतीय पुणे संघाची निवड करण्यात आली. सहभागी संघातील खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आली. यावेळी जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दादा मिठबावकर, चॉकबॉल असोसिएशनचे राज्य सचिव सुरेश गांधी, मुख्याध्यापक एम. व्ही. लिंकर, सचिव संजय पेंडुरकर, उपाध्यक्ष संजय नाईक, क्रीडा अधिकारी सचिन निकम, संस्था उपाध्यक्ष यशवंत भोजने, भाऊ खटावकर, शेखर पेणकर, एस. बी. गावडे, भूषण गावडे, प्रकाश कदम, राजन पेंडुरकर, एकनाथ राऊळ, बी. एम. वाजंत्री, सुभाष म्हाडगूत, अॅड. रुपेश परुळेकर, उदय वायंगणकर, बाबू टेंबुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिगरबाज : विवेक, शामलीची खेळी
कोल्हापूर विभागाचा अष्टपैलू खेळाडू विवेक बंडगर याने कोल्हापूर संघातर्फे खेळताना जिगरबाज खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याने ३५ हून अधिक गोल केले. त्याला प्रदीप कोळी, ओंकार पाटील, प्रसाद चव्हाण या खेळाडूंची साथ लाभली. या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर पुणे संघाला २५ गुणांनी नमवले.
मुलींच्या गटातून झालेल्या अंतिम सामन्यात शामली इंगळे व पायल जाधव यांनी नेत्रदीपक कामगिरी करत कोल्हापूर संघाला दोन गुणांनी पराभूत केले.
मुलींचा अंतिम सामना ४७-४५ असा रंगतदार झाला. सिंधुदुर्ग जिल्हा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष दादा मिठबावकर यांनी उत्कृष्ट खेळाडूंना रोख रक्कम देऊन गौरविले.