वरखेड येथे साकारला जाणार कोल्हापुरी बंधारा
By admin | Published: January 15, 2015 10:44 PM2015-01-15T22:44:00+5:302015-01-15T22:44:00+5:30
तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे.
वरखेड : तिवसा तालुक्यातील वरखेड येथे लवकरच कोल्हापुरी बंधारा साकारणार असल्याने सुमारे शंभर हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ६५ लक्ष रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिल्याची माहिती आहे.
तिवसा तालुक्यातील वरखेड गावामधील पठारावरील शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकरी पाण्याअभावी सिंचनापासून वंचित आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात शेतीचा विकास खुंटला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील ज्ञानेश्वर बेलूरकर यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी १३ मे २०१४ रोजी जिल्हा परिषद अमरावती येथील कार्यकारी अभियंता क्षीरसागर, विभागीय कार्यालय रवींद्र पाठक सहाय्यक अधीक्षक अभियंता स्थानिक स्तर पाटबंधारे व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले होते. अधीक्षक अभियंता यांनी शेतकऱ्यांची तळमळ पाहता वरखेड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या नियोजित जागेचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून तिवस्याचे उपविभागीय अभियंता अे.आर. डाखोरे यांनी कामाचे सर्वेक्षण करून ६५ लक्ष रूपयांचे अंदाजपत्रक तयार केले. हे अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अधीक्षक अभियंता रवींद्र पाठक यांना सादर केले.
६५ लक्ष रूपयांच्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामाला महाराष्ट्र शासनाची अंतिम मंजुरात मिळण्याकरिता अधीक्षक अभियंता यांनी विदर्भ सदन सिंचन योजना कार्यालय नागपूरचे मुख्य अभियंता यांचेकडे पाठविले. त्यांनी सदर कोल्हापुरी बंधारा विदर्भ सधन सिंचन योजनेत समाविष्ट करून अंतिम मंजुरातीसाठी शासनाकडे पाठविले.
या बंधाऱ्याला तत्काळ मंजुरात मिळावी म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण गावनर यांना निवेदन करून हिवाळी अधिवेशनात ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे व विजय शिवतारे यांनी भेटीची वेळ मागून या विषयावर ना. पंकजा मुंडे व विजय शिवतारे व रामकृष्ण गावनर यांच्यासोबत चर्चा करून वरखेड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला लवकरच विदर्भ सधन सिंचन योजनेच्या निधीमध्ये तरतूद करून प्रत्यक्ष कामाला त्वरेने सुरुवात करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.निवेदन देताना ज्ञानेश्वर बेलूरकर, रामकृष्ण गावनर, अशोक इंगळे, गजानन बनसोड, प्रकाश मनोहर, श्रीराम हरणे, नामदेव मनोहर, शामराव फटींग, पंकज गडलिंग, अमित इंगळे, चंपत सोनटक्के उपस्थित होते. या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील १०० हेक्टरच्यावर सिंचन क्षमता वाढणार असून शेतकऱ्यांसाठी हा कोल्हापुरी बंधारा नवसंजीवनी ठरणार आहे.