कोळी महादेव समाजाच्या मोर्चाची विभागीय आयुक्तालयावर धडक; शासनाविरोधात घोषणाबाजी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: December 15, 2023 07:55 PM2023-12-15T19:55:32+5:302023-12-15T19:56:03+5:30
उपोषणाच्या दहाव्या दिवशी विभागातील समाजबांधव एकवटले
अमरावती: कोळी महादेव समाजाच्या विविध मागण्यांसाठी येथील विभागीय कार्यालयावर उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या दहाव्या दिवशी विभागातील हजारो समाजबांधवांचा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली व मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला पाठविण्यात आले.
विभागातील कोळी महादेव जमातीला संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सन १९५० पूर्वीचे पुरावे विचारात घेऊन अन् जमाती पडताळणी समिती अमरावती यांनी विभागातील कोळी महादेव जमातीला वैधता प्रमाणपत्र द्यावे. १९५० पूर्वीची कोळी नोंद असलेली कोतवाल बुक नक्कल वास्तव्याचा पुरावा म्हणून वापरावा, यासह अन्य मागण्यांसाठी राजेंद्र जुवार व गजानन चुनकीकर यांचे उपोषण सुरू आहे. दहाव्या दिवशी याच मागण्यांसाठी उमेश ढोणे यांच्यासह आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघ व बेरार कोळी महादेव आदिवासी सेवा संस्थांसह महादेव कोळी समाजबांधवांनी प्रचंड मोर्चाद्वारे शासन- प्रशासनाचे लक्ष वेधले.