कुलर लावताना जपा जीवाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:29 AM2019-04-05T01:29:31+5:302019-04-05T01:30:00+5:30
तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
धीरेंद्र चाकोलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. कूलरचा शॉक लागून प्राणांतिक अपघात झाल्याच्या अनेक अप्रिय घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे कुलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी. लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह येऊ नये, याकरिता कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा व त्यानंतरच त्यात पाणी भरावे. कुलरच्या आतील वीज तार पाण्यात बुडाली नसल्याची खात्री करून घ्यावी. कूलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. कूलरची वायर सदैव तपासून बघा. फायबर बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीच्या कूलरचा वापर प्राधान्याने करा. यामुळे अपघात टाळता येतील. दैनंदिन व्यस्ततेतून थोडासा वेळ या उपाययोजनांकरिता दिला, तर कुलरमुळे होणारे विजेचे अपघात मोठ्या प्रमाणात टळू शकतात. या उपाययोजनांची अंमलबजावणी करीत अप्रिय घटना टाळण्याचे आवाहन महावितरण अमरावती परिमंडळातर्फे करण्यात येत आहे.
एलसीबीचा वापर करा
कधी कुलरजवळ खेळताना विजेचा धक्का बसल्याने, तर कधी टिल्लू पंप सुरू करतेवेळी विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतात. ते टाळण्यासाठी ग्राहकांनी कुलरचा वापर सदैव थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात ‘अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स’ (एलसीबी) बसवून घ्यावे. विजेचा धक्का बसताच या उपकरणामुळे वीज प्रवाह खंडित होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.
प्रायमिंगबाबत ठेवा भान
बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा ज्ञानाच्या अभावामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. त्यामुळे विजेचा शॉक लागण्याची शक्यता असल्याने चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे.
विजेची बचत शक्य
कूलरमधील पाण्याचा पंप पाच मिनिटे सुरू व १० मिनिटे बंद ठेवणाऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटचा वापर केल्यामुळे विजेचीही मोठ्या प्रमाणात बचत शक्य आहे.