घुंगरांचा आवाज हटविल्याने अमरावतीची कौंडण्यपूर यात्रा ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:17 PM2017-11-15T12:17:18+5:302017-11-15T14:27:43+5:30
रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. शेतकऱ्यांच्या हाती यंदा फारसे काही न लागल्यामुळे बाजारपेठेतही उत्साह दिसला नाही.
काही वर्षांपूर्वी एक महिन्याच्या कौंडण्यपूर यात्रेत टूरिंग टॉकीज, आकाश पाळणे, सर्कस असायची. तमाशाचे फड रंगायचे. पाच ओळीत लागणारी दुकाने आता एकाच ओळीत संपतात. यात्रेत भाविक मोठ्या संख्येने असले तरी खरेदी होत नसल्यामुळे व्यावसायिकांची निराशा झाली आहे. यात्रेत आर्थिक उलाढाल येथे आलेल्या लोकांच्या प्रमाणात काहीच झाली नसल्याचे येथील व्यावसायिकांचे मत आहे.
उलाढाल फक्त शनिवार-रविवारी
यात्रेच्या दिवसांमध्ये केवळ शनिवार व रविवार या दोनच दिवशी मोठी उलाढाल होत असल्याचे येथे स्टॉल लावलेल्या विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वीच्या तुलनेत व्यवसाय मंदावल्याने आता अन्य व्यावसायिकदेखील येथे येण्यास फारसे उत्सुक दिसत नाहीत. भविष्यात ही यात्रा बंद पडण्याची भीती दुकानदारांनी व्यक्त केली.