तिवस्यात कोसळधार, राष्ट्रीय महामार्गावर साचले तळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:49+5:302021-09-05T04:16:49+5:30
शहरातील काही भागात घरातही शिरले पाणी, वैभव वानखडे यांच्या तत्परतेने उपाययोजनांना गती फोटो - तिवसा ०४ सप्टेंबर ओ फोटो ...
शहरातील काही भागात घरातही शिरले पाणी, वैभव वानखडे यांच्या तत्परतेने उपाययोजनांना गती
फोटो - तिवसा ०४ सप्टेंबर ओ
फोटो कॅप्शन : मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी घरात शिरल्याने नुकसानाची पाहणी करताना तहसीलदार फरतारे.
तिवसा : शहरात शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे पेट्रोल चौकपासून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. शहरातील काही भागात घरांमध्येही पाणी शिरले होते.
हवामान खात्याने अतिशय पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो तिवस्यात खरा ठरला. प्रभाग क्र. १७ येथे नाल्यालगत असलेल्या घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. तासाभराच्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली होती. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने काही वेळ हायवेला तलावाचे स्वरुप प्राप्त होते होते. सर्व्हिस रोड पाण्याने ब्लॉक झाला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी तातडीने या ठिकाणी पोहोचून रस्त्याच्या कंत्राटदार कंपनीला फोन करून उपाययोजना करून घेतल्या.
पावसामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. काही घरांचे नुकसान झाल्याची दखल घेत रात्री उशिरा तहसीलदार वैभव फरतारे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतचे कर्मचारी सुधीर विघ्ने, सचिन मकेश्वर, स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर, एनएसयूआय तालुकाध्यक्ष अनिकेत प्रधान व स्थानिक युवकांनी मदतकार्य राबवत रात्री जेसीबीने रपटा फोडून अतिरिक्त पाण्याला वाट मोकळी केली.