कोतवाली कोठडीचा पहारेकरी कुंभकर्णी झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:31 PM2017-11-03T23:31:34+5:302017-11-03T23:32:04+5:30

पोलीस आयुक्तांच्या आकस्मिक भेटीदरम्यान कोतवाली ठाण्याच्या पोलीस कोठडीचा पहारेकरी कुंभकर्णी झोपेत असल्याचे आढळले.

Kottwali Kothdi watch clerk sleeping | कोतवाली कोठडीचा पहारेकरी कुंभकर्णी झोपेत

कोतवाली कोठडीचा पहारेकरी कुंभकर्णी झोपेत

Next
ठळक मुद्देसीपींची आकस्मिक भेट : इन्चार्जवरही करणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस आयुक्तांच्या आकस्मिक भेटीदरम्यान कोतवाली ठाण्याच्या पोलीस कोठडीचा पहारेकरी कुंभकर्णी झोपेत असल्याचे आढळले. या प्रकरणात इन्चार्जसह पहारेकरीवर कारवाई होणार आहे.
शहरात घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक असे सर्व वरिष्ठ अधिकारी डोळ्यात तेल टाकून रात्रकालीन गस्त घालत आहेत. मध्यरात्रीनंतर पोलीस यंत्रणा किती सजग राहून कर्तव्य बजावतात, हे पाहण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास गाडगेनगरसह कोतवाली ठाण्यात आकस्मिक भेट दिली. गाडगेनगरातील बहुतांश कारभार व्यवस्थीत वाटला; मात्र कोतवाली ठाण्यात सीपी दत्तात्रय मंडलिक दाखल होताच कोठडीतील आरोपींच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळणारे इन्चार्ज एएसआय दिगांबर अंबाडकर व पहारेकरी (संट्री) मनोहर सहस्त्रबुद्धे चक्क झोपलेल्या अवस्थेत दिसले. हा गंभीर प्रकार बघताच पोलीस आयुक्तांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी सहस्त्रबुद्धेंना हलवून झोपेतून उठवण्याचे प्रयत्न केले. मात्र, सहस्त्रबुद्धे हे कुंभकर्णी झोपेत होते. त्यामुळे ते तत्काळ उठू शकले नाही. सहस्त्रबुद्धे हे नागपूरी गेट पोलीस ठाण्यात कार्यरत असून, माजी सैनिक आहे. आरोपींवर देखरेख सोडून ते रात्रीच्या झोपा घेत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही इन्चार्ज अंबाडकर यांच्यावर होती. आता पोलीस आयुक्त दोघांवर काय कारवाई करतात, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.
कुलूपबंद रायफलची चावी सापडेना
सुरक्षा गार्ड सहस्त्रबुध्दे मध्यरात्री झोपा काढत असताना त्यांच्याजवळील रायफल टेबलाच्या दांड्याला कुलूपबंद अवस्थेत आढळून आली. पोलिस आयुक्तांच्या भेटीदरम्यान त्यांना झोपेतून उठवण्यात आले आणि रायफलचे कुलूप उघडण्यास लावले. मात्र, घाबरगुंडी उडालेल्या सहस्त्रबुद्धेंना चावीसुद्धा सापडत नव्हती.
झोपडपट्टीत अफवांचे पेव
पोलीस आयुक्तांनी गुरुवारी शहरात रात्रकालीन गस्त लावली. त्यांनी अकोली रोडवरील म्हाडा कॉलनी परिसराची झडती घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये चोरांच्या टोळीसंदर्भात अफवांचे पेव फुटल्याचे आढळून आले. ही अफवा असल्याचे सीपींनी नागरिकांना पटवून सांगितले. अफवांचे पेव याच भागात पसरल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Web Title: Kottwali Kothdi watch clerk sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.