कोतवालीत तक्रार भंडारी, दुबेला अटक

By Admin | Published: May 18, 2017 12:03 AM2017-05-18T00:03:59+5:302017-05-18T00:03:59+5:30

शासकीय नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’ अशा आस्थापनांची नोंद केल्याच्या

Kottwaliat Gaurav Bhandari, Dubey arrested | कोतवालीत तक्रार भंडारी, दुबेला अटक

कोतवालीत तक्रार भंडारी, दुबेला अटक

googlenewsNext

एनओसीवर लिहिले, ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासकीय नाहरकत प्रमाणपत्रात कर्मचाऱ्याची नजर चुकवून स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्ड रुम, पूल’ अशा आस्थापनांची नोंद केल्याच्या आरोपावरुन घनश्याम भंडारी (५५, गणेश कॉलनी), अमित दुबे (३५, अंबागेट) यांच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करणे, ठकबाजी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे नोंदवून बुधवारी अटक केली.
शहरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरविरुद्ध ‘लोकमत’ने आवाज बुलंद केल्यानंतर सर्वच हुक्का पार्लरवर कारवाईचे आसुड ओढले गेले. सामाजिक स्तरातून असल्या व्यवसायाविरुद्ध घृणा व्यक्त केली गेली. दरम्यान ३ मे रोजी घनश्याम भंडारी यांनी महापालिका आयुक्तांकडे घनश्याम पूल टेबल पार्लर, घनश्याम हुक्का पार्लर, घनश्याम व्हिडिओ गेम पार्लर आणि घनश्याम कार्डरुम पार्लर अशा चार व्यवसायांसाठी नाहरकत प्रमाणपत्रांची मागणी केली.

जुन्या अर्जाचा घेतला आधार
अमरावती : हे चारही पार्लर मुख्य टपाल कार्यालयाजवळील हॉटेल काशमध्ये चालविले जाणार असल्याचे विनंती अर्जात नमूद केले होते. भंडारी यांचे हे चार अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग, उपायुक्त नरेंद्र वानखडे आणि त्यांच्याकडून नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांकडे पाठविले गेलेत. सर्व अर्ज नामंजुर केले गेले.
भंडारी आणि दुबे यांनी पुन्हा शक्कल लढविली. शहरातील हुक्का पार्लरविरुद्धचे वातावरण बघता राजरोसपणे नाहरकत प्रमाणपत्र मिळविणे अशक्य असल्याचे त्यांनी हेरले. ३० मार्च रोजी या ठकबाजांनी उद्योग तथा वीज वापराकरिता दिल्या जाणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी महापालिकेतील नगररचना विभागात अर्ज केला. त्यात त्यांनी मनोरंजनासाठी ‘क्लब हाऊस आॅर अदर रिक्रिएश्नल अ‍ॅक्टीव्हिटीज, कंडक्टेड अ‍ॅज बिजनेस’ असा उल्लेख केला. मनोरंजनासाठी क्लब हाऊसला परवानगी देण्याची तरतूद असल्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाने त्यासाठीचे नाहरकत प्रमाणपत्र जारी केले. या नाहरकत प्रमाणपत्रावर इतर चार पार्लरचा उल्लेख भंडारी आणि दुबे यांनी संगनमताने केला. सर्वच चारही पार्लरला नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याचे भासविण्यासाठी हे षड्यंत्र त्यांनी रचले.

कनिष्ठ लिपिकाने भंडारी आणि दुबेंबद्दल तक्रार केल्यानंतर १२ मे रोजीचे फुटेज तपासले त्यात ठकबाजीचा प्रकार उघड झाला. आयुक्तांच्या आदेशाने त्या दोघांविरुद्ध फौजदारी तक्रार करण्यात आली.
- सुरेंद्र कांबळे, एडीटीपी

असे फुटले बिंग
दुबे आणि भंडारी १२ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास कनिष्ठ लिपिक दिलीप फुलाडी यांच्याकडे गेले. प्रशासनाने क्लब हाऊसला नाहरकत प्रमाणपत्र मंजूर केले होते. तथापि हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्डरुम आणि पूल यासाठीचे प्रमाणपत्र मात्र नाकारले गेले होते. क्लब हाऊसचे नाहरकत प्रमाणपत्र फुलाडी यांनी भंडारी यांच्या हाती दिले. त्यानंतर फुलाडी हे काही कामानिमित्त त्यांची खुर्ची सोडून इतरत्र गेले. फुलाडी यांनी त्यांच्या आलमारीत ठेवलेले फाईल दुबे यांनी काढले. त्यातील नाहरकत प्रमाणपत्राची प्रत काढली. ती भंडारी यांना दिली. भंडारी यांनी त्यावर स्वहस्ताक्षरात ‘हुक्का पार्लर, व्हिडिओ गेम, कार्डरुम, पूल’ अशा अक्षरांची नोंद केली. हे लिहून होते न होते, तोच फुलाडी परतले. घाई घाईने दुबे याने ते फाईल पुन्हा आलमारीत ठेवले. दोघेही तेथून निघून गेले. जाताना त्यांची भेट फुलाडी यांच्याशी झालीही. हा सर्व घटनाक्रम सदर कक्षात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
आलमारी उघडी दिसल्याने फुलाडी यांना संशय आला. त्यांनी लागलीच दुबे आणि भंडारी यांना शोधण्यासाठी कार्यालयाबाहेर जाऊन बघितले. ते दिसले नाहीत. दुसऱ्या दिवशी फुलाडी यांनी फाईल तपासली. ज्या आस्थापनांची परवानगी महापालिका प्रशासनाने नाकारली त्यांची नोंद नाहरकत प्रमाणपत्रावर झाल्याचे त्यांना दिसले.

सीसीटिव्हीत ठकबाजी बंदिस्त
अमरावती : प्रकरण कळल्यावर नगररचना सहसंचालक सुरेंद्र कांबळे यांनी १२ मे रोजीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. घडलेला सारा प्रकार लक्षात आला.
आयुक्तांच्या आदेशाने भंडारी आणि दुबे यांच्याविरुद्ध शासकीय दस्तऐवजात खोडतोड केल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात फुलाडी यांच्या सहीने बुधवारी नोंदविण्यात आली. तत्काळ गुन्हे दाखल करुन भंडारी आणि दुबे यांना अटक करण्यात आली.
ही कारवाई पीआय निलिमा आरज यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आर.एस. लेवटकर, पोलीस शिपाई मनिष सावटकर यांच्यासह डीबी पथकाने केली.

Web Title: Kottwaliat Gaurav Bhandari, Dubey arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.