कोव्हॅक्सिन निरंक, किविशिल्ड संपण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:29+5:302021-04-16T04:12:29+5:30
अमरावती : केंद्र शासनाने लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले असताना जिल्ह्यात मात्र, केंद्रांची दैना आहे. कोविशिल्डचा साठा ...
अमरावती : केंद्र शासनाने लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले असताना जिल्ह्यात मात्र, केंद्रांची दैना आहे. कोविशिल्डचा साठा जेमतेमच आहे, तर कोव्हॅक्सिन चार दिवसांपासून निरंक आहे. जिल्ह्यातील १२५ पैकी ७५ केंद्रांना टाळे लागले आहेत. रेमडेसिवीर गायब आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात आयुधांचीच वाट लागली असल्याने कसा रोखणार कोरोना, असा नागरिकांचा सवाल आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत चार टप्प्यांत लसीकरण करण्यात येत आहे. या कालावधीत आतापर्यंत २,०३,७१५ नसागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. यात एका आठवड्यांपासून लसीकरणाची वाट लागली आहे. कोविशिल्डचा साठा संपल्याने चार दिवसांपासून लसीकरण बंद होते. साडेचार लाख डोसची मागणी असताना प्रत्यक्षात २० हजार डोस मिळाले आहेत. याशिवाय कोव्हॅक्सिनचा साठा देखील तीन दिवसांपासून संपलेला आहे. त्यामुळे कोविशिल्डही आता दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे सध्याच १२५ पैकी ७५ केंद्राला टाळे लागले आहे. दोन दिवसांत डोसची उपलब्धता न झाल्यास जिल्ह्यातील जवळजवळ सर्व केंद्र बंद राहणार असल्याची स्थिती जिल्ह्यावर ओढवली आहे.
बॉक्स
असे झाले लसीकरण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हेल्थ केअर वर्कर २७,७४१, फ्रंट लाईन वर्कर २४,१२१, याशिवाय ४५ वर्षांवरील कोमार्बिडिटी ५१,०८८ व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील १,००,७८५ ज्येष्ठ नागरिक यांचे बुधवारपर्यंत लसीकरण करण्यात आलेले आहे. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने ही केंद्र दोन दिवसांपासून बंद असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.