चांदूर बाजारातील कोविड सेंटर बनले रुग्णांचे मनोबल वाढण्याचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:12+5:302021-06-09T04:16:12+5:30
चांदूर बाजार : तिरुपती मंगल कार्यालयातील जम्बो कोविड सेंटरवर उपलब्ध असलेल्या सोयी व सुविधांबाबत रुग्ण समाधान व्यक्त करीत ...
चांदूर बाजार : तिरुपती मंगल कार्यालयातील जम्बो कोविड सेंटरवर उपलब्ध असलेल्या सोयी व सुविधांबाबत रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत. येथे कोरोना रुग्णांना योगासने, दर्जेदार आहार, उत्तम वैद्यकीय सेवा मिळत असल्याने चांदूर बाजारातील कोविड सेंटर रुग्णांचे मनोबल वाढविण्याचे केंद्र बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शासनातर्फे गृह विलगीकरणाला बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तिरुपती मंगल कार्यालय येथे १०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांना याच कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे. अशात कोरोना रुग्णांचा उत्साह, मनोबल वाढविणे गरजेचे आहे. याकरिता कोविड सेंटरमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करण्यात आले आहे. यासाठी नुकतेच अहिल्याबाई होळकर जयंती, शिवराज्यभिषेक दिन, रुग्णांचे वाढदिवससुद्धा या कोविड सेंटरवर साजरे केले गेले. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी संजय गोमकाळे यांच्याकडून योगाचे धडेसुद्धा दिले जात आहे. हे कोविड केंद्र गावापासून लांब, निसर्गरम्य ठिकाणी आहे. त्यामुळे रुग्णांना शुद्ध हवा व निसर्गरम्य वातावरण सह स्वादिस्ट जेवण मिळत असल्याने याचा फायदा रुग्ण बरा होण्यास कारणीभूत ठरत आहे. येथे राज्यमंत्री बचू कडू यांनी दोनदा भेट देऊन रुग्णांना आस्थेने विचारपूस केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योत्स्ना भगत व अन्य वैद्यकीय अधिकारी परिश्रम घेत आहेत.